डिजिटल किल्ले रायगड !!!
नमस्कार, दैनिक किल्ले रायगडवर प्रेम करणार्या असंख्य चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनम्र अभिवादन !!!
आजपासून म्हणजेच 2 जून 2020 पासून डिजिटल किल्ले रायगडची विविधांगी-विविधरंगी वेबसाईट www.killeraigad.com आपल्या भेटीला येत आहे. ही वेबसाईट सर्वांगसुंदर बनविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
किल्ले रायगड वृत्तपत्राला 52 वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. आमचे बाबा कै. ल. पा. वालेकर यांनी 1967 साली शिवजयंतीच्या मुहूर्तावर किल्ले रायगडची मुहूर्तमेढ रोवली. स्थानिक बातम्यांना ठळक प्रसिध्दी मिळू लागल्याने ते अल्पावधीत विलक्षण लोकप्रिय झाले. 1986 साली 20 व्या वर्धापनदिनी रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित असणार्या किल्ले रायगडची कार्यकक्षा नवी मुंबईपर्यंत वाढविली. 15 ऑगस्ट, 1999 पासून साप्ताहिक किल्ले रायगड टॅब्लाईड आकारात दैनिक स्वरुपात प्र्रसिध्द होऊ लागले, तर 15 ऑगस्ट 2005 पासून पूर्ण आकारात दैनिक किल्ले रायगड प्रसिध्द होऊ लागले. आज रायगड जिल्हा आणि नवी मुंबई परिसरात एक अग्रेसर आणि विश्वसनीय वृत्तपत्र अशी किल्ले रायगडची प्रतिमा आहे.
वृत्तपत्रसृष्टीत 52 वर्षांची समृध्द परंपरा लाभलेले आपले दैनिक किल्ले रायगड, डिजिटल किल्ले रायगड स्वरुपात प्रसिध्द होत आहे. Digital killeraigad चे स्वरुप अत्यंत व्यापक विविधांगी आणि सर्वस्पर्शी असणार आहे. येथे सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण घडामोडींचा अचूक वेध घेण्यात येणार असून कला, क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, आरोग्य, शैक्षणीक, महिला जगत, मुलांचे विश्व अशा विविध विषयांवर विचारप्रवर्तक लेख, कथा, कविता आणि इतर उद्बोधक माहिती सरळ, साध्या, सोप्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. प्रगल्भ आणि सशक्त समाजनिर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणार्या विविध उपक्रमांना तसेच व्यक्ती आणि संस्थांना व्यापक प्रसिध्दी देण्याचा आमचा मनोदय आहे.
समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असून शासनाच्या धेय्य-धोरणांना ठळक प्रसिध्दी देऊन शासन आणि जनता यामध्ये समन्वय साधण्यासाठी डिजिटल किल्ले रायगड नेहमिच प्रयत्नशील राहणार आहे. www.killeraigad.com या वेबसाईट बरोबरच यू ट्यूब चॅनेल, फेसबुक आणि ट्विटर पेज लक्षवेधी ठरेल अशा पध्दतीने सादर केले जाणार असून ही समाज प्रबोधनात्मक आणि मनोरंजक साहित्याची मेजवानी आपल्याला नक्कीच आवडेल. किल्ले रायगडच्या वेबसाईटला तसेच यू ट्युब चॅनेलला, फेसबुक आणि ट्विटर पेजला दररोज भेट देऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करुन आमचा उत्साह नक्कीच वाढवाल असा विश्वास वाटतो.