अनेक घरांमध्ये सकाळी न्याहरीला ब्रेड, बटर, जाम असं काही तरी खातात. वाढदिवसाला केक कापला जातो. दररोज च्यवनप्राश घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात आइस्क्रिम खाल्ले जाते. सकाळच्या ब्रेकफास्टला सिरील्स आणि घालायला अगदी नामांकीत बँ्रडचा मध वापरला जातो. ते सर्रास दिसत आहे. हे आज आठवायचे कारण म्हणजे. आज या सर्व गोष्टी स्कॅनरखाली आल्या आहेत. आपण रोज जे नामांकीत बँ्रडचे पॅकेज्ड फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खातो ते खरोखरच शरीरासाठी किती योग्य आहेत याची चर्चा सुरू झाली आहे. बोर्नव्हिटामध्ये असणार्या भरमसाठ साखरेच्या प्रमाणाची माहिती सोशल मिडीयावर उघड झाली आणि सोशल मिडीयावर बोर्नव्हीटा व्यतिरिक्त इतर अनेक प्रॉडक्टसची पोलखोल सुरु झाली. हे सगळे समजायला कठीण आहे. आज पॅकेज्ड फूड विकत घेताना आतल्या पदार्थामध्ये किती प्रमाणात सोडीयम, प्रोटीन, साखर इत्यादी पदार्थ आहेत, ते लिहिलेले असते. बरेचजण ते तपासूनही पाहतात. त्याला कारणीभूत वाढता मधुमेह आणि हृदयरोग. पण खरोखरच हे वाचून आम्हाला कळते का? तर त्याचे उत्तर नाही’ असे आहे.
पॅकेज्ड फूड इंडस्ट्री आज एका संक्रमणातून जात आहे. यातील स्पर्धा तीव्र आहे आणि पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल आणि आरोग्यपूर्ण असण्याबद्दल प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. जे सर्वात कमी हेल्दी, ते सर्वाधिक खपते असा अनुभव आहे. जंक फूड म्हणजे काय, तर ज्यात साखर, फॅट आणि सोडीयम जास्त असेल ते… असे ढोबळ मानाने मानायला काहीच हरकत नाही. त्यामुळे येणारे स्थुलत्व हे ब्लडप्रेशर, डायबिटीस आणि त्यातून पुढे येणारा पक्षाघात याला आमंत्रणच देत असते. त्याला कारण बैठी जीवनशैली आणि ताणतणाव. पण मुख्यत: जंक फूडच कारणीभूत आहेत. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रीशन ऑफ हँडबुक यांनी जीवनशैली आणि प्रत्येकाची शरीर रचना याच्या आधारे सोडीयम, साखर याचे प्रमाण पदार्थात किती असावे, याचे कोष्टक प्रकाशित केले आहे. एखाद्या अॅथलिट जीवनशैलीच्या खेळाडूला लागणार्या साखरेचे प्रमाण बैठी जीवनशैली आणि हृदयरोगाची पार्श्वभूमी असणार्या चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तीला लागणार्या साखरेचे प्रमाण सारखे असू शकत नाही. पण केवळ सेलिब्रिटी जाहिरात करतात म्हणून ही प्रॉडक्टस घेतली जातात. त्यामुळे घरातून ताजे फायबरयुक्त शिजवलेले अन्न, प्रथिनयुक्त पदार्थ आता हद्दपार होत आहे. किचनमध्ये पॅकेज फुडची रास दिसून येते. ताजे अन्नपदार्थ कमी कमी होत चालले आहेत. त्याचाच अर्थ हेल्दी फूड’ आहाराबद्दल आपल्याकडे योग्य ती जागृती झालेली नाही.
एखाद्या पदार्थावर त्यातील घटक प्रमाणांचे कोष्टक छापलेले असते. एक तर ते अत्यंत बारीक अक्षरात असते आणि त्यातले आकडे हे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे असतात. समजा, 200 मिलीलीटर शितपेयामध्ये 20 ग्रॅम साखर असेल तर ती उपकारक की अपायकारक हे समजत नाही. पण किमान अलिकडे लोक ते वाचू लागले आहेत हे ही नसे थोडके. याबाबत प्रत्येकाने अभ्यास करून निर्णय घेणे जवळपास अशक्य आहे. मुळात अशा प्रकारे कोष्टक असावे की नसावे. असले तर ते कसे असावे, या विषयी धोरण पातळीवर घोळ सुरु आहे. या संदर्भात कायद्याचा एक आराखडा झाला आहे. पण तो चर्चा होऊन सभागृहात सहमत झालेला नाही. म्हणून काही जागरुक नागरिकांनी सिगारेटच्या पाकिटावर असते तशी चित्रमय वॉर्निंग खाद्यपदार्थांच्या पाकिटावर असावीत, अशी सूचना केली. अर्थातच कंपन्यांना ती मान्य नाहीत पण ग्राहकहिताचा विचार करता योग्यच म्हणायला हवीत. लॅटीन अमेरिकन देशात काही वर्षांपूर्वी बाजारात मिळणार्या पदार्थांवर रंग अथवा चित्रांच्या स्वरूपात अशा सूचना दिलेल्या असायच्या. सोडीयमची मात्रा 0.5 मिलीग्रॅम आहे, असे सांगण्यापेक्षा ती धोकादायक आहे अथवा नाही याचे एखादे चित्र छापले तर ते ग्राहकला चटकन समजेल. उदा. मेद, साखर, सोडीयमचे प्रमाण अधिक असेल तर ती टक्केवारी छापण्याऐवजी लाल रंगाचा षट्कोन अथवा त्रिकोण छापला तर तो चटकन समजतो. हे होणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण लहान मुलांमध्ये अतिस्थुलत्व, मध्यमवर्गीय समाजात वाढलेले जंक फूडचे सेवन या सगळ्यामुळे आमची खाद्यसंस्कृती बदलून गेली आहे.
पाश्चात्य खाद्यसंस्कृतीचे अंधानुकरण ही न जाणवलेली मोठी समस्या आहे. साधी भाजी, भाकरी ताटात पडत नाही. त्याऐवजी नुडल्स किवा पिझ्झा पानात पडतो. साखरेचे अतिप्रचंड प्रमाण असणारा केक वाढदिवसाला कापला जातो. हे सर्व फक्त शहरी मध्यमवर्गात आहे, असे नाही तर इतर वर्गांमध्येही आहे. आयसीएमआर या संस्थेचा एक अहवाल ओडीशामधील आदिवासी ग्रामीण भागात राहणार्या समाजाच्या खाद्यसंस्कृतीबद्दल भाष्य करतो. काल-परवापर्यंत येथे कुपोषण ही समस्या असायची आता ब्लडप्रेशर, डायबेटिसचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. कंबरेचा घेर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. याचा अर्थ आपली शारीरिक गुणसूत्रे, जीवनशैली आणि आहारपद्धतीतील बदल स्वीकारत नाहीत, हे उघड आहे.