Sunday, June 11, 2023
More
  Homeसंपादकीयलेखस्त्रियांचे कलर कॉन्सेप्टस् अर्थात स्त्रियांची रंग परिभाषा

  स्त्रियांचे कलर कॉन्सेप्टस् अर्थात स्त्रियांची रंग परिभाषा

  अलिकडे आपण मराठीजन रंगपंचमी हा आपला मराठमोळा सण साफ विसरुन गेलो आहेत. होळीनंतर पाचव्या दिवशी येणार्‍या रंगपंचमी ऐवजी होळीच्या दुसर्‍या दिवशी असणारा (मुख्यत: परप्रांतियांचा) धूळवड हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. (धुळवडीऐवजी रंगपंचमीच्या दिवशी (निदान महाराष्ट्र सरकारने) सुट्टी जाहीर केली तर लोक धुळवडीऐवजी रंगपंचमीला रंगपंचमी साजरी करतील का ?  
  असो, आपण यानिमित्ताने जरा रंगांच्या दुनियेत डोकावूया… पण स्त्रियांच्या रंगांच्या दुनियेत. त्यांची रंगांची परिभाषा रुढ परिभाषेपेक्षा खूप वेगळी आहे

  स्पर्श, गंध, रंग, रुप, चव या 5 मानवी संवेदनांमधली रंग ही एक  महत्त्वाची संवेदना आहे. मानवी जीवनात रंगांचे स्थान अनन्यसाधारण  आहे. निसर्गात रंगच नसते तर आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांसारखं एकसुरी, उदासवाणं झालं असतं. अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांना मी अजिबात वाईट म्हणणार नाही. अनेक कृष्णधवल चित्रपट अगदी ‘क्लासी’ होते. पण यातलाच एक क्लासी ‘मुगल-ए-आझम’ काही वर्षांपूर्वी जेव्हा सप्तरंगात न्हाऊन निघाला तेव्हा तो अधिक खुलला हेही वास्तवच आहे. 
  मूल जन्मतं तेव्हापासूनच त्याच्या जीवनात रंग येतात. जन्माला येणारं मूल काळं आहे की गोरं ही उत्सुकता (आई सोडून) सगळ्यांनाच असते. जन्माला आलेलं मूल ही मुलगी असेल आणि ती जर गोरीपान असेल तर (बर्‍याच पालकांचं) मुलगी झाल्याचं दु:ख काहीसं कमी होतं हे वास्तव आहे. आपल्या ‘काळ्या’ लोकांच्या देशात गोरेपणाला नको तितकं महत्त्व असल्यामुळे आणि (स्वत: काळेकुट्ट असले तरी) ‘गोरीच बायको हवी’ असा बोहल्यावर बसलेल्या तमाम नवरेमंडळींचा हट्ट असल्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत तर रंग गोरा असणे ही फारच मोठी जमेची बाजू मानली जाते. प्रेम, नोकरीतल्या संधी आणि (आयुष्यातली इतिकर्तव्यता म्हणजे) लग्न या सगळ्यात माणसाचा रंग खूप ‘मॅटर’ करतो. गोर्‍या मुलींच्या आत्मविश्वासाची लेव्हल अंमळ जास्त असते. म्हणून तर त्या ब्यूटी पार्लर्सचे उंबरठे झिजवतात आणि ‘फेअर अँड लव्हली’ सारखी उत्पादने गोरेपणाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये कमावतात. 

  इंद्रधनुष्यात सात रंग असतात हे आपण लहानपणीच शिकतो आणि 
  पावसाळ्यात अनुभवतोही. पण हे सात मुख्य रंग झाले. निसर्गात यातील 
  प्रत्येक रंगाच्या अक्षरश: हजारो छटा आहेत. एका थिअरीनुसार निसर्गात अक्षरशः लाखो रंगछटा (शेडस्) आहेत. थॅक्स टू अवर आइज…  आपले मौल्यवान डोळे या सगळ्या रंगछटा अनुभवू शकतात, त्या डिफरन्शिएट करु शकतात, त्यांचे विश्लेषण करु शकतात. (माणसानेच तयार केलेल्या कम्प्युटरला केवळ 256 शेडस् सापडल्या आहेत.) 
  सतराव्या शतकात रंगीत छपाई सुरु झाली तरी तिला खूप मर्यादा होत्या. 1970 च्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक कलर सेपरेशनचे तंत्र माणसाच्या 
  हाती गवसले आणि मुद्रण क्षेत्रात मोठीच क्रांती झाली. यलो, रेड  (मॅजेंटा) आणि ब्लू (सायन) आणि फिनिशिंग कलर म्हणून ब्लॅक या चार रंगांच्या संयोगातून अनेकरंगी छपाई होऊ लागली. अलिकडे मासिकेच नाही तर रोजची वर्तमानपत्रेही रंगीत झाली आहेत. 

  पूर्वी गाड्यांचे रंग पांढरा, काळा, लाल, पिवळा आणि निळा इतकेच 
  मर्यादित असत. आता मिस्टीक ब्लू, कॅडेट ब्लू, कॅप्री ब्लू, नेपच्यून टर्कोइस, नायगारा ग्रीन, स्टील ग्रे, सँड बेज, र्शंपेन बेज, डायना ऑलिव्ह, 
  अपोलो रेड, इंडियन रेड, मार्स रेड, कार्निवल रेड अशा शेकडो गाड्यांच्या 
  रंगछटा पहायला मिळतात. 
  घराला रंग देण्याच्या (पेंटींग कलर्सच्या) अशाच असंख्य शेडस आहेत. (त्यातही बाहेरुन आणि आतून असे दोन ढोबळ प्रकार आहेत). तर छपाईच्या (प्रिंटिंगच्या) आणखी वेगळ्या. छपाईतही पेपरवर करण्याच्या 
  छपाईच्या वेगळ्या, प्लॅस्टीक वा कापडावर करण्याच्या छपाईच्या वेगळ्या, 
  धातूंवर करावयाच्या छपाईच्या वेगळ्या. चित्रकलेत वॉटर कलर्स वेगळे 
  आहेत, पोस्टर कलर्स वेगळे आहेत, पेस्टल कलर्स वेगळे आहेत, अ‍ॅक्रिलिक कलर्स वेगळे आहेत. कापडांच्या रंगांच्याही अशाच असंख्य शेडस आहेत. मित्रांनो, या सगळ्या तांत्रिक नावांव्यतिरिक्त बर्‍याच अतांत्रिक शेडससुद्धा आहेत त्या आहेत, बायकांच्या प्रचलित भाषेतल्या. 

  स्त्रियांची रंगांची एक वेगळीच परिभाषा आहे असे म्हणायला हरकत  नाही. कदाचित दैनंदिन जीवनांत त्यांचा ज्या ज्या गोष्टींशी संपर्क येतो त्यांचेच संदर्भ, परिमाणे त्यांनी रंगांना बहाल केली असावी. (आजही बर्‍याच) बायकांचा वावर जास्त करुन स्वयंपाकघरात असल्यामुळे त्यांच्या रंगाच्या जगात खाद्यपदार्थ, फळे आणि भाज्यांनाही स्थान आहे. म्हणून तर डाळींबी कलर, चटणी कलर, गहू कलर, दुधी कलर, टोमॅटो कलर, बैंगणी (वांगी) कलर, अंजिरी कलर, लिंबू कलर, करवंदी कलर, बिस्कीट कलर,पिस्ता ग्रीन, मेहंदी ग्रीन हे शब्द तुम्हाला कधी ना कधी तुमच्या घरात, तुमच्या पत्नीकडून, बहिणीकडून वा आईकडून ऐकायला मिळाले असतील. स्त्रियांच्या परिभाषेतील सोनसळी कलर, अबोली कलर, शेवाळी कलर, बदामी कलर, मोतिया कलर, राणी कलर, चिंतामणी कलर, तपकिरी, विटकरी, किरमिजी, पीच, मरुन आणि अशा असंख्य कलर शेडस आहेत, ज्यांची तांत्रिक व्याख्या करता येत नाही, त्यांचे पर्सेंटेज, प्रमाण ठरविता येत नाही. मग या शेडस्चं स्टँडर्डायझेशन कसं करणार ? ते करायचं नसतंच मुळी ! प्रत्येक स्त्रीच्या मनातली चटणी, गहू, लिंबू, अबोली, शेवाळी, बदामी, दुधी, टोमॅटो, वांगी इ. रंगांची ‘इन्टेन्सिटी वेगळी असते. ती त्या त्या संबधित (साडी, ड्रेस मटेरियल इ.) दुकानदारांना कळण्याशी मतलब ! 

  मुळात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक संवेदनशील असल्यामुळे रंगांच्या बाबतीतही त्या विशेष संवेदनशील असाव्यात. छपाईच्या इंक्समध्ये ब्राइट यलो, डीप ब्राऊन, पॉप्युलर ग्रीन, युनिव्हर्सल रेड, रॉयल ब्लू अशा सर्व शेडस ठरलेल्या आहेत. कुठल्याही कंपनीची शाई घेतलीत तरी तिच्या शेडमध्ये फरसा फरक पडणार नाही. इथे बायकांच्या परिभाषेतला ‘चटणी कलर’ हा प्रत्येक स्त्रीनुसार (तिच्या जहाल, अतिजहाल, कमी जहाल प्रकृती-प्रवृत्तीनुसार) बदलणार ! एखाद्या स्त्रीने एखाद्या दुकानदाराकडे चटणी कलरचा ब्लाऊज पीस किंवा दोरा मागितला आणि त्याच्या डोळ्यासमोर (त्या स्त्रीला अभिप्रेत असलेल्या) मिरची-कोथिंबीर-खोबर्‍याच्या हिरव्या चटणीऐवजी त्याने दुपारीच खाल्लेल्या लसणीची लालभडक चटणी आली तर? 
  लिंबू कलरचाही तोच प्रकार ! वसई वा अलिबागचे लिंबू वेगळे असणार, कल्याण आणि पनवेलचे वेगळे असणार ! (शिवाय त्यात कच्चे, अर्धकच्चे, पिकलेले अशा कॅटेगरीजसुद्धा !) (या लिंबू कलरबद्दल मी ङ्गार ताणून धरत नाही कारण रंगांच्या अधिकृत भाषेत लेमन यलो कलर आहे !) आकाशी रंगाचेही तेच! मला सांगा, आकाशाचा रंग सगळीकडे, सगळ्या ऋतूत एकच असतो का ? इथेही आकाशी – कंसात हिवाळ्यातलं आकाश किंवा डिसेंबरमधलं आकाश असं का म्हणत नाहीत ? मोरपिशी रंग हाही एक गोंधळात टाकणारा रंग आहे. मोराच्या पिसार्‍यामध्ये अक्षरश: अनेक छटा असतात. त्यातला नेमका कोणता रंग मोरपिशी म्हणून बायकांना अभिप्रेत असतो ? पण मोरपिशी म्हटलं की दुसर्‍या स्त्रीला आणि मुख्यत: दुकानदारांना बरोब्बर कळतं. मोरपिशी रंगाशी साधर्म्य सांगणारा ‘पिकॉक ब्लू’ हा एक रंग मुद्रणाच्या परिभाषेत आहे, पण गंमत म्हणजे तो मोरपिशी रंग म्हणून स्त्रियांना मान्य नाही. किरमिजी म्हणजे नक्की कुठला ते अजून मला समजलेलं नाही. 

  दुधी कलर म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर हलक्या हिरव्या रंगाचा दुधी भोपळा येईल, पण दुधी कलर म्हणजे दुधाचा रंग म्हणे! शेवाळी कलर म्हणतात तेव्हा नक्की कुठलं शेवाळं त्यांना डोळ्यासमोर असतं देवास ठाऊक ! कारण शेवाळं ही एक पाणवनस्पती आहे आणि तिच्या बर्‍याच जाती आहेत. प्रत्येकाची शेड वेगळी ! डबक्यातलं शेवाळं वेगळं अन् जलाशयातलं शेवाळं वेगळं ! बदामी कलर म्हटला की आपल्या डोळ्यासमोर बदामांचा ब्राऊन कलर येतो पण त्याला बदामी रंग म्हणायचं नाही. स्त्रियांच्या परिभाषेतला मोतिया कलर म्हणजे मोत्याच्या दागिन्यांचा कलर नाही ! चिंतामणी कलर म्हटलं तर (चिंतामणी हे गणपतीचे नाव समजून) आपण शेंदरी रंगाला चिंतामणी कलर म्हणू तर चूक ठरु. 

  चटणी कलर, गहू कलर, लिंबू कलर, टोमॅटो कलर, वांगी कलर, अंजिरी कलर, शेवाळी कलर, अबोली कलर, बदामी कलर हे एकवेळ ठीक आहेत. कारण त्यातून काही रंगबोध तरी होतो, पण राणी कलर…? हा सर्वात कन्फ्युझिंग कलर आहे! (पुरुषांना आवडती राणी व नावडती राणी हे दोन ठळक प्रकारच माहीत असतात. फारतर इस्पिक, बदाम, किलवर, चौकटची राणी!) तुम्ही राणी कलर म्हणता तेव्हा तुम्हाला कोणती राणी अभिप्रेत असते? किंवा जो राणी कलर मानला गेला आहे त्याला राणी कलर का म्हणायचं याचं समाधानकारक उत्तर मला मिळालं नाही. एका मित्राच्या ‘राणी’ला विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘राणी कलर म्हणजे गुलबाक्षी रंग. हा रंग बहुतेक स्त्रियांना आवडतो, कुणालाही खुलून दिसतो आणि कशावरही ‘मॅच’ होतो म्हणून तो राणी कलर!’ (पण गुलबाक्षीमध्येही अनेक रंगछटा आहेत त्याचं काय?) पिंक मध्येही बेबी पिंक आणि डार्क पिंक असे दोन प्रकार आहेत. 

  तुम्हा-आम्हाला जो गुलाबी कलर अभिप्रेत असतो तो बायकांना नसतो. विशेषत: एखाद्या पाकक्रियेसंबधात. तुम्ही प्रयोगादाखल एखादी रेसिपी वाचा.. त्यात एक वाक्य तुम्हाला हमखास आढळेल… अमका पदार्थ ‘गुलाबी होईपर्यंत’ कढईत भाजा/परता. बिलीव्ह मी, त्या पदार्थाला आजन्मात गुलाबी रंग येत नाही. इथे गुलाबी म्हणजे फिकट तांबूस असा अर्थ घ्यायचा असतो. 
  आपल्या संस्कृतीमध्येच नव्हे तर जगभरात रंगांना विशिष्ट अर्थ आहेत. जसा पांढरा रंग शांतीचा, पावित्र्याचा, लाल रंग शक्तीचा, पिवळा ज्ञानाचा, हिरवा सुबत्तेचा-तारुण्याचा-चैतन्याचा, गुलाबी प्रेमाचा, भगवा त्यागाचा, निळा सुख व शांतीचा, काळा व करडा (ग्रे) दु:खाचा, शोकाचा. रंगांचे हे अर्थ स्त्रियांच्या कितपत गावी असतात देवास ठाऊक. ‘मॅचिंग’ हा मात्र त्यांचा मुख्य निकष असतो! त्यांच्याकडे एखाद्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज नसेल (किंवा होत नसेल) तर ती साडी तितके दिवस नेसली जात नाही. 
  या मॅचिंगवरुन तुम्हाला एक जोक सांगतो. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रांत, दूरदर्शनच्या चॅनल्सवर पोलीसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने दुचाकीस्वारांना हेल्मेट कंपल्सरी केल्याच्या बातम्या, त्यावर उलटसुलट चर्चा रंगत होत्या त्या पार्श्‍वभूमीवरचा हा जोक आहे.. ‘एक दिवस सकाळी शामराव घाईघाईने घराबाहेर पडताना बघून शेजारच्या बाबूरावांनी त्यांना विचारले, शामराव इतक्या घाईघाईने कुठे निघालात ?’ शामराव म्हणाले ‘अहो, स्कूटर विकून कार खरेदी करायला चाललोय !‘ बाबूरावांनी तोंडाचा मोठ्ठा आ वासून म्हटले, ‘स्कूटर विकून गाडी खरेदी करणार ? हा काय प्रकार आहे?’ शामराव म्हणाले, ‘बाबूराव असं काय करताय, आता दुचाकीस्वारांना हेल्मेट कंपल्सरी केलंय माहीत आहे ना ?’ ‘हो माहित्येय ! पण त्यासाठी स्कूटर विकण्याची काय गरज ?’ हा बाबूराव अगदीच कसा मठ्ठ ? असा चेहरा करत शामराव म्हणाले, ‘असं पहा बाबूराव, माझी बायको आणि माझ्या दोन्ही मुली स्कूटर वापरतात. या तिघी त्यांच्या ड्रेसेस आणि साड्यांना मॅचिंग अशी हेलमेटस् उद्या नक्की विकत घेणार ! मला सांगा, ही शंभर-दोनशे हेलमेटस् ठेवायची कुठे ? त्यापेक्षा त्या हेल्मेटच्या पैशात एक कार नाही का येणार ?’ यावर डोक्यात एक हजार वॅटस्चा प्रकाश पडल्यागत बाबूराव टिचकी वाजवून म्हणाले, ‘थांबा शामराव, मी पण माझी स्कूटर घेऊन येतो !’  

  एकूणच स्त्रियांचे रंगांवर मनस्वी प्रेम असते. ज्या रंगाच्या कपड्यांची  पुरुष कल्पनाही करु शकणार नाहीत असे रंग स्त्रियांना हमखास आवडतात. या सर्व रंगांचे ड्रेसेस, साड्या, त्यांच्यावरचे मॅचिंग ब्लाऊज, टॉप वा ओढण्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात असे त्यांचे स्वप्न असते. 
  स्त्री कोणत्या रंगाचे कपडे परिधान करते यावरुन तिचा स्वभाव, वृत्ती, 
  संस्कृती सहज कळू शकते. सोबर रंगाचे कपडे परिधान करणारी व्यक्ती 
  शांत, संयमी, सोबर स्वभावाची तर भडक रंगाचे कपडे घालणारी व्यक्ती 
  उथळ, आक्रमक असू शकते. अर्थात सरसकट असे विधान करता येत नाही.

  मराठीतलं एक प्रसिद्ध दैनिक नवरात्रात स्त्रियांना जणू फर्मान सोडतं… उद्या तिसरी माळ… उद्याचा रंग अमुक अमुक ! हे फर्मान सुटताच, खूळ लागल्यासारखं त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी बायका धडपडू लागतात. आपल्या मैत्रिणींनाही त्यासाठी आटापिटा करायला लावतात. स्वत:कडे एखाद्या विशिष्ट रंगाची साडी नसेल तर त्या शेजारणीकडून वा मैत्रिणीकडून नव्हे तर चक्क विकत आणतात. कारण त्या मैत्रिणीलाही त्याच रंगाची साडी त्याच दिवशी परिधान करायची असते ना ! या खर्चाचं आणि धावपळीचं चीज होतं ते त्यांचा ग्रूप फोटो त्या दैनिकात छापून आल्यावर. (चेहरा ओेळखूही येणार नाही इतका छोटा असला तरी) स्वत:चा फोटो पेपरात छापून आल्यावर त्या स्त्रीला स्वर्ग अक्षरश: दोन बोटे उरतो. मग ती नातेवाईक, मैत्रिणी, सोसायटीतले, ऑफीसमधले सहकारी यांनी तो आवर्जून पहावा यासाठी फोन करीत सुटते. अलिकडे म्हणूनच एप्रिल-मे-जून या पारंपरिक लग्नाच्या सीझनपेक्षा नवरात्रीच्या सुमारास साडी व्यवसायात मोठी उलाढाल होऊ लागली आहे असे म्हणतात. 

  पाहिलंत, रंग काय जादू करतात ? पेपरात फोटो आला म्हणून स्त्रिया खूष, स्त्रिया खूष म्हणून त्यांचे पतीराज खूष ! साड्यांना अचानक डिमांड आल्याने साडीचे व्यापारी खूष ! या साडीवाल्यांच्या जाहिराती मिळाल्या म्हणून पेपरचे अ‍ॅडव्हर्टायझिंग मॅनेजर खूष ! या भानगडीत पेपरचा खप काही हजारांनी वाढला म्हणून पेपरचे सर्क्युलेशन मॅनेजर खूष ! (एका फोटोत 15 ते 20 स्त्रियांचे फोटो असे एका दिवशी किमान 25 फोटो 9 दिवस. एक महिला आपला फोटो आलेल्या वृत्तपत्राच्या किमान चार प्रती घेणार या हिशेबाने 20 x25 x9 x4 = 18,000 प्रती वाढल्या की !) या मास पब्लिसिटीमुळे या दैनिकाचे इव्हेंटस् स्पॉन्सर करायला कंपन्यांची झुंबड उडाल्यामुळे पेपरचे कमर्शियल मॅनेजर खूष ! फोनाफोनीमुळे रोज प्रत्येक कंपन्यांचा चांगला धंदा झाला म्हणून मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर्स खूष! अशा रितीने स्त्रियांची ही रंगाची आवड सगळीकडे खुषीचा माहोल उभा करते. 
  सो फ्रेंडस.. एंजॉय कलर्स.. रंग उडवा… उधळू नका !
  हॅप्पी रंगपंचमी ! 

  -जयंत टिळक 
  jayant.tilak@gmail.com
  Mobile : 98194 05245

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: