पनवेल,दि.18 (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेतील सर्व कायम सफाई कामगारांना वारसा हक्कांच्या लाभाबाबत माहिती देण्याकरीता आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानूसार दि. 17 मार्च रोजी पनेवल महानगरपालिकेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी सहाय्यक आयुक्त नामदेव पिचड, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे,प्रभाग अधिकारी दिपक शिलकन,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, रोशन माळी, सर्व स्वच्छता निरीक्षक,सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाड -पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या सुधारीत तरतुदी बाबत सफाई कामगारांना माहीती देण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य विभागात कार्यरत कायम सफाई कामगारांना लाड -पागे समिती अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वारसा हक्काबाबत, सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त झाल्यावर ,वैद्यकिय दृष्ट्या अपात्र झाल्यास , सेवेत असताना दिवंगत झाल्यावर मिळणा-या लाभाबाबत माहिती देण्यात आली. या अनुषंगाने सफाई कर्मचार्यांनी घ्यावयाची दक्षता, नियुक्ती प्राधिकरण समितीच्या जबाबदार्या याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
महापालिकेने 2018पासुन लाड-पागे शिफारशीखाली 46 वारसदारांना नोकरीचा लाभ दिला आहे. तसेच महापालिकेने अनुकंपाखाली 25 वारसदारांना नोकरीचा लाभ दिला आहे.
महापालिका प्रशासनाने बैठकीमध्ये दिलेल्या या माहितीबद्दल सफाई कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सतीश चिंडालिया यांनी समाधान व्यक्त करून पालिका प्रशासनाचे आभार मानले.