मकरराशीला प्रणाम करुनी
रवितेजाचा दिन आला
सण आला सण आला
संक्रातीचा सण आला ——– || धृ . ||
चला जाऊया गच्चीवरती

पतंग जीवनी उडवू या
संग करुनी सवंगड्यांचा
रंग धनूचे उधळू या
झटकून टाका मरगळ मनीची
संकल्पाचा दिन आला – सण आला–||१ ||
तिळातल्या स्नेहास सेवूनी
मनबुद्धीला पुष्ट करूया
गुळातला गोडवा चाखूनी
वाद आपुले मिटवू या
आरोग्याचा मंत्र जपत बघ
स्नेहबंध घेऊनी आला- सण आला—||२ ||
नवी नवराई माहेरवाशीण
साज तिचा भरजरी
भाळी लेऊन हळदीकुंकू
सवाष्ण।चे वाण करी
करीत पूजन मानव्याचे
संस्कारांचा दीप आला -सण आला —|| ३ ||

— सुरेंद्र पारवे