चिरनेर दि. 24 (दत्तात्रेय म्हात्रे) : उरण तालुक्यातील चिरले गावात, शेकापचे सरपंच सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम विशेष पंधरवडा मोहीम अंतर्गत बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी कार्यक्रम 23 मे. रोजी घेण्यात आला होता. सध्या सर्वत्र खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असून, शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वत्र राबविला जात आहे

चिरले येथे उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात, तालुका कृषी अधिकारी शिगवण यांनी ग्राम बिजोउत्पादनाचे महत्त्व विशद केले.
याप्रसंगी शेकापचे सरपंच सुधाकर पाटील यांनी शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा हा महत्त्वाचा आहे .हा सातबारा पिढ्यान पिढ्या जिवंत ठेवण्यासाठी जमिनीची विक्री होऊ देऊ नका. असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी शेतकर्यांना दिला. कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. ढवळ यांनी उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकर्यांसाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे सांगितले. तर कृषी सहाय्यक अधिकारी डी. टी. केणी यांनी फळबाग लागवड योजना आणि शेती विषयक अवजारे या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती देऊन , बियाणे उगवण, क्षमता अर्थात बीज प्रक्रियेचे शेतकर्यांना महत्त्व पटवून देऊन, प्रात्यक्षिक करून दाखविले.
दरम्यान तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनच्या कविता ठाकूर यांनी कृषीच्या विविध योजना व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया, उद्योग योजनांची विस्तृत माहिती यावेळी शेतकर्यांना दिली. यावेळी चिरले गावातील महिला भगिनी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग उरणचे अधिकारी आणि चिरले ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.