पनवेल दि. 13 (संजय कदम) : एजन्सींचे जाहीरात फलक बनविण्यासाठी ठेवलेले लाखो रुपये किमतीचे लोखंडी पाईप पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने हस्तगत केले आहे.

परवेज नाजीर खान यांची जाहिरात एजेन्सी असून त्यांनी जाहीरात फलक बनविण्यासाठी बी.एड. कॉलेज समोरील रस्त्यावर, पनवेल बस स्टॅन्डच्या जवळ ठेवलेले लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी परवेज खान यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना रविंद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने 5 लाख रुपये किमतीचे 2 पाईप व 2 लाख रुपये किमतीचा एक पाईप असे एकूण 7 लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप हस्तगत केले आहे.