पनवेल दि. 23 (साहिल रेळेकर) : गुजरातच्या सुरत कोर्टाने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवार दि.23 मार्च) ’जेलभरो आंदोलन’ करण्यात आले. यावेळी ’मोदी सरकार हाय हाय’, ’मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेस भवन व पनवेल शहर पोलीस ठाणे येथे निदर्शने करण्यात आली.

दरम्यान पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे राहुल गांधी यांना सूनवलेल्या शिक्षेबाबत निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासंदर्भात महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे पत्रही देण्यात आले. केंद्रातील हुकूमशाह बनलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून सरकार विरोधी बोलणार्यांना, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज उचलणार्या नागरिकांचे व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून ही सुनावणी लोकशाहीला मारक आहे. तरी आपणाकडून या सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, चंद्रकला नायडू, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग, प्रितेश साहू, हेमराज म्हात्रे, डॉ.अमित दवे, विश्वजीत पाटील, रमेश राव, भारती जळगावकर, किरण तळेकर, मंजुळा कातकरी, राकेश जाधव, आरती ठाकूर, विनया पाटील, जयश्री खटकाले, शीला घोरपडे, पूजा मोहन, लतीफ नलखंडे, सुनिता माळी, दीपा ढाले, सायरा अहमद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2019 साली काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाषणामध्ये जे वक्तव्य केले होते की, सगळे मोदी चोर आहेत का? त्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल झाला आणि आज त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. हे सुडाचे राजकारण लोकशाहीला मारक आहे. अश्या पद्धतीने काँग्रेस नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने केसेस लावणार असाल तर आतापर्यंत भाजप नेत्यांनी काँग्रेस विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानुसार भाजपचा एकही नेता, पदाधिकारी प्रचार करण्यासाठी शिल्लक राहणार नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे त्याचा आम्ही पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. – सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस