माथेरान दि. 23 (मुकुंद रांजाणे) : माथेरान मध्ये पर्यावरण पूरक रस्ते व्हावेत यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे सध्यातरी युद्धपातळीवर सुरू असून नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए कामगारांची लगबग सुरू असून महिला कामगार सुध्दा तितक्याच जोमाने पुरुष कामगारांच्या खांद्याला खांदा लावून एकदिलाने धावपळ करताना दिसत आहेत.

मागील काळात जे ब्लॉक लावले गेले होते त्यामध्ये सिमेंटचा वापर असल्याने उन्हाळ्यात उष्णता जाणवत होती परंतु सध्या वापरण्यात येत असलेले क्ले पेव्हर ब्लॉक हे माती पासून बनविण्यातआलेले आहेत त्यामुळे याचा उष्णतेमुळे सहसा त्रास जाणवत नसल्याचे व्यापारी वर्गामध्ये बोलले जात आहे. आजवरच्या धुळीच्या त्रासाला तोंड देऊन नाकीनऊ आले होते. धुळीमुळे दुकानातील मालाचे सुध्दा प्रचंड नुकसान होत असे. परंतु सनियंत्रण समितीच्या परवानगी नुसार ज्या पद्धतीने हे ब्लॉक लावले जात आहेत ते खरोखरच धूळ विरहित रस्त्याला खूपच फायदेशीर असल्याचे व्यापारी वर्गामधून ऐकावयास मिळत आहे. यापूर्वी पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे रस्त्यांना अक्षरशः एखाद्या नाल्याचे स्वरूप पहावयास मिळत होते. त्यामुळे रस्त्यावरून चालताना खूपच जिकिरीचे बनले होते. परंतु हे क्ले पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून पूर्ण होणारे रस्ते एकसंध असून अगदी सहजपणे पायी प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे. मुख्य बाजारपेठ मधील धुळीचा त्रास जवळजवळ हद्दपार झाल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तर पर्यटक सुध्दा रेल्वे स्टेशन पासून आपली बॅग सहज ओढून नेताना दिसत आहेत.आगामी काळात सुध्दा ज्या ज्या नियोजित रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत ती सुद्धा युद्धपातळीवर पूर्ण केली जाणार असल्याने नागरिकांनी सुटेकचा निःश्वास सोडला आहे.