पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात 25 रुपयांनी वाढ
उरण दि. 25( वार्ताहर) ः मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात शुक्रवार पासून ( दि.26) 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास दरवर्षी प्रमाणे महागणार आहे.

दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात वाढ केली जाते.मागील वर्षीही तिकिट दरात वाढ करण्यात आली होती.यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात 80 रुपयांंवरुन 105 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.हाफ तिकिट दरातही 39 रुपयांवरुन 53 रुपयांपर्यंत म्हणजे 9 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.ही दरवाढ 26 मेपासूनच 31 ऑगस्ट पर्यंत लागु राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरिक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.
दरवर्षी मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात 20 ते 25 रुपयांपर्यंत वाढ केली जाते.त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते.त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकिट दरवाढ केली जाते.मात्र 2022 सालीच्या पावसाळी हंगामानंतर सीजन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ केली नसल्याने आश्चर्य वाटत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.