‘ग्लोबल सी-लेव्हल राइज अँड इम्प्लिकेशन्स’ नामक या अहवालात नमूद केल्यानुसार समुद्र पातळी वाढल्यामुळे विविध खंडातील अनेक मोठी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. यामध्ये शांघाय, ढाका, बँकॉक, जकार्ता, मुंबई, मापुटो, लागोस, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ब्युनोस आयर्स आणि सँटियागो आदींचा समावेश आहे. हे एक मोठे आर्थिक, सामाजिक आणि मानवतावादी आव्हान आहे, यात तीळमात्र शंका नाही. समुद्राच्या पातळीत वाढ होण्यामुळे मानवी जीवन आणि त्यांची उपजीविका तसेच किनारपट्टीवरील कृषी जमीन आणि पाण्याचे साठे तसेच पायाभूत सुविधा धोक्यात येतात. न्यूयॉर्कमधील ‘सँडी’ चक्रीवादळ आणि मोझांबिकमधील ‘इडाई’ चक्रीवादळाच्या भूभागाप्रमाणेच समुद्राच्या पातळीतील सरासरी वाढीवरही परिणाम होतात. वादळाची लाट आणि भरतीच्या बदलांमुळे समुद्रपातळी वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हवामान मॉडेल आणि महासागर-वातावरण भौतिकशास्त्रानुसार अंटार्क्टिकामधील सर्वात मोठ्या हिमनदीच्या वितळण्याचा दरही अनिश्चित आहे. त्यामुळेच धोका गंभीर आहे.
जगभर समुद्राच्या पातळीतली वाढ एकसारखी नसून प्रादेशिक पातळीवर बदलते. मात्र, समुद्राची पातळी सातत्याने वाढत असून त्यामुळे समुद्रकिनार्यावर वसलेली शहरे, वसाहती आणि पायाभूत सुविधा पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. यासोबतच किनारपट्टीच्या परिसंस्थेवरही परिणाम होणार आहे. अशा भागात शहरीकरणाचा कल कायम राहिल्यास धोका आणखी वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, हवामानातील बदलामुळे अन्न उत्पादन आणि शहरांमधील प्रवेशावर दबाव वाढेल, विशेषत: संवेदनशील भागात याचे गांभीर्य जाणवेल. अन्न सुरक्षा आणि पोषण कमी होईल. दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा यांची तीव्रता वाढेल. समुद्राची जागतिक सरासरी पातळी 2020 च्या पातळीच्या तुलनेत 0.15 मीटरने वाढली तर किनारपट्टीच्या संंपर्कात येणार्या 20 टक्के लोकसंख्येला ङ्गटका बसेल. समुद्राची सरासरी पातळी 0.75 मीटरने वाढल्यास 40 टक्के लोकसंख्येला किनारपट्टीच्या पुरामुळे नुकसान संभवते तर पातळी 1.4 मीटरने वाढल्यास 60 टक्के लोकसंख्या प्रभावित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
समुद्रतटी पसरलेल्या महाकाय मुंबईने आजवर अनेकांचे आयुष्य तारले आहे. बुडू पाहणार्या अनेक जीवांना इथल्या किनार्यांनी आसरा दिला आहे. वर्षानुवर्षे जमा होणारी सगळी घाण पोटात साठवून ते या नगरीकाठी खंबीरपणे उभे आहेत. मात्र त्यांची ही साथ आणखी किती वर्षे टिकेल, हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने ऐरणीवर आला असून येत्या काही वर्षांमध्ये मुंबई पाण्यामध्ये लुप्त होण्याचा नव्याने व्यक्त केला गेलेला धोका मुंबईकरांसह समस्त देशाची चिंता वाढवणारा आहे. मानवी चुकांबरोबरच वातावरणातील बदलांमुळे उद्भवू पाहणारी ही स्थिती नियंत्रित करण्यासाठी आपल्या हाती वेळ शिल्लक आहे की नाही, याविषयीदेखील संभ्रमच आहे.
अलिकडेच मांडण्यात आलेल्या या ताज्या संशोधनानुसार आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट लोकांवर 2050 पर्यंत वाढत्या समुद्रपातळीचा परिणाम होऊ शकतो आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई नकाशावरुन पुसली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. खेरीज संशोधकांनी उपग्रह वाचनाच्या आधारे जमिनीची उंची मोजण्याचा अधिक अचूक मार्गही विकसित केला आहे. हा मोठ्या क्षेत्रावरील समुद्राच्या पातळीच्या वाढीच्या परिणामांचा अंदाज लावण्याचा एक मानक मार्ग असल्याचे मान्य करण्यात आले आहे. याद्वारे संशोधकांनी मांडलेले चित्र अत्यंत विदारक असून पूर्वी यासंदर्भात मांडले गेलेले आकडे खूपच आशावादी होते, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. न्यू जर्सी येथील ‘क्लायमेट सेंट्रल’ या विज्ञानसंस्थेनेही एक शोधनिबंध तयार केला असून तो ‘नेचर कम्युनिकेशन्स’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. भविष्यातील लोकसंख्यावाढ, किनारपट्टीची धूप यासारख्या कारणांमुळे जमीन समुद्रात लुप्त होण्याचा धोका आणखी गहन बनण्याची शक्यता त्यांनीही वर्तविली आहे.
अशा प्रकारे अनेकांनी एकसारखा सूर आळवला असताना या प्रश्नाची दाहकता समोर आल्याखेरीज राहत नाही. मुंबई समुद्राखाली जाण्याची शंका घेण्याचे एक कारण म्हणजे जमीन कमी होणे. असे सातत्याने होत राहिल्यास पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याखाली बुडतो. हे मोठ्या प्रमाणावर भूजल उत्खनन, खाणकाम, नैसर्गिक पाणथळ जमीन कमी होणे, पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठी संख्या आणि मोठ्या प्रमाणावरील पर्यावरणीय बदल यामुळे होते. हे शहर दर वर्षी 50 मिलिमीटर वेगाने बुडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

