माथेरान दि. 23 (मुकुंद रांजाणे) ः ऐन सुट्टयांच्या हंगामात शटल सेवेच्या कमी फेर्यांमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. बहुतांश पर्यटक हे खासकरून मिनिट्रेन मधून प्रवास करण्यासाठी दुरदुरुन येत असतात. परंतु बोग्याची संख्या सुध्दा कमी असून अमन लॉज ते माथेरान दरम्यान ठराविक फेर्या असल्यामुळे पर्यटकांना तिकिटे उपलब्ध होत नाहीत याचा एकंदरीतच इथल्या पर्यटनावर परिणाम झालेला दिसून येत आहे याकामी येथील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने दि.17 मे रोजी मावळ मतदार संघातील खासदार श्रीरंग बारणे यांची पनवेल येथील कार्यालयात भेट घेऊन मिनिट्रेन बाबतीत सविस्तरपणे माहिती देऊन निवेदन सादर केले होते त्यावेळी बारणे यांनी मध्य रेल्वेच्या संबंधीत अधिकारी यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात यावी असे सूचित केल्याप्रमाणे या मार्गावर शटल सेवेच्या फेर्यात वाढ करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, दिलीप कदम, पराग सुर्वे,माथेरान धनगर समाज माजी अध्यक्ष राकेश कोकळे आदी उपस्थित होते.

नेरळ माथेरान दरम्यान मिनीट्रेनच्या केवळ दोन फेर्या होत आहेत. नेरळ माथेरान या एकमेव मार्गावर घाटरस्त्यात सुट्टयांच्या हंगामात वाहनांची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा पर्यटक माघारी जातात याकामी नेरळ ते माथेरान दरम्यान या गाड्यांची संख्या वाढवावी त्याचप्रमाणे पावसाळ्यात चार महिने नेरळ ते माथेरान ही सेवा बंद असते त्यामुळे दसर्याच्या शुभमुहूर्तावर या गाड्यांची संख्या वाढल्यास याठिकाणी पर्यटकांना प्रवास करणे सुखकर होऊ शकते.असेही शिष्टमंडळाने बारणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढला जाईल असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले