पुणे दि. 19 (बाबू डिसोजा याजकडून) : पिंपरी चिंचवड प्राधिकरण- दि. 15 मार्च ला स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाचे महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले स्नेहसंमेलन अतिशय उत्साहवर्धक आणि जल्लोशपूर्ण वातावरणात पार पडले. मंडळाच्या अनेक सदस्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि सर्वांचेच सादरीकरण खूपच सुंदर होते.

भजन, भावगीते, चित्रपटगीते, लोकगीते, भारुड, कविता, नाट्यछटा, उखाणे, विनोदी किस्से, योगासने अशा सगळ्याच कलांचा कार्यक्रमात समावेश होता. त्या निमित्ताने सदस्यांमधील विविध गुणांचे दर्शन झाले आणि खर्या अर्थाने विविध गुणदर्शन म्हणता येईल असा कार्यक्रम झाला.
मैत्रिणींना प्रोत्साहन द्यायला आणि त्याच्या सादरीकरणाला दाद द्यायला विभागातील सदस्यांची अतिशय उल्लेखनीय अशी उपस्थिती होती. सर्वांच्याच सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.त्यानंतर सरस्वती पूजन आणि भारतमाता पूजन चा कार्यक्रम झाला. स्वागत आणि प्रास्ताविक विनिता श्रीखंडे यांनी केले. अध्यक्षा शिल्पा बिबीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता श्रीखंडे आणि नम्रता चिटणीस यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.
या नंतर स्वराज्य 75 निमित्ताने पथनाट्य झाले. राष्ट्र सेविका समिती, यमुनानागर, बालशाखा यातील मुलींचा सहभाग असलेले हे पथनाट्य अतिशय प्रभावी असेच झाले. उज्वला जाधव यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाला 90 महिला विभाग सदस्या आणि 20 स्वराज्य 75 निम्मित पथनाट्य टीम अशी एकूण 110 एवढी उपस्थिती होती.