Sunday, June 11, 2023
More
  Homeमहाराष्ट्रमुंबईभारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकजागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल...

  भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकजागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल : राज्यपाल

  मुंबई, दि. 14 : इंदू मिल दादर येथे तयार होणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री अविनाश महातेकर, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर, अखिल भारतीय भिक्खू संघांचे उपाध्यक्ष भदंत डॉ. राहुल बोधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितिचे महासचिव नागसेन कांबळे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष उत्तम मगरे यावेळी उपस्थित होते.

  राज्यपाल रमेश बैस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू असलेले व्यक्तिमत्व होते. वंचित आणि उपेक्षित समाज बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी ते अहोरात्र लढले. मुंबई शहर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. इथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि जागतिक स्तरावरचे नेतृत्व म्हणून इथेच ते नावारुपास आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी मुंबई दर्शनच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टुरिझम सर्किट’साठी बस सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासन या माध्यमातून उपक्रम राबवत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. समता, बंधुता व न्याय ही तत्व समाजामध्ये रुजविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीवर आपण सर्वांनी चालले पाहिजे असेही ते म्हणाले.

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आपल्या देशाचे नाव जगात आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना नव्याने सुरू करत आहोत. त्यासाठी राज्य शासन 20-22 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. बार्टीच्या वतीने देण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती साठी 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.विविध महामंडळाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात येत आहे. इंदू मिल येथील जागतिक दर्जाचे स्मारक लवकरच पूर्ण करणार आहे. बौद्धजन पंचायत समितीच्या इमारतीसाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असून, वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देण्यात येणार्‍या पुरस्कारांचे देखील लवकरच वितरण करण्यात येईल. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात आनंदाचा शिधा’ आपण वितरण करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे, याचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जाते. समाज सुधारणा केल्यामुळे आज एक सुधारलेला देश म्हणून आपण ओळखले जातो. समाजातील सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध संस्था स्थापन केल्या आहेत. सारथी, महाज्योती या संस्थांमधून त्या-त्या समाजघटकांसाठी आपण काम करतोय.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मंत्र त्यांनी समाजाला दिला. त्यादृष्टीने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही करत आहोत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात 441 वसतीगृहे व 90 निवासी शाळांमध्ये 61 हजार 500 विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली जाते. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणास प्रोत्साहन देत आहोत. त्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय घेतला आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला मार्गच खरा विकासाचा मार्ग :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी भारताला दिलेले सविंधान हे अनमोल देणगी आहे. भारत वेगाने विकास करत आहे याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. संविधान ही जगात आपल्याला पुढे नेणारे ठरेल. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण काम केले पाहिजे. इंदूमिल येथील स्मारकांचे काम वेगाने सुरु आहे. कामात येणार्‍या अडथळ्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेवून अडथळे दूर करण्यात येईल. पुढील वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण करणार आहोत. जगाच्या पाठीवर हेवा वाटेल असे स्मारक होणार आहे. लंडन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहीलेले घर महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात घेतले असून त्या घरामध्ये संग्रहालय सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

  नागपूर येथील दीक्षाभूमी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध करीत आहोत. त्यासाठी भरीव निधी दिला आहे. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित टुरिजम सर्किट’ तयार करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला मार्गच खरा विकासाचा मार्ग असून त्याच मार्गाने राज्य शासनाची वाटचाल सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: