
कुठे गेली मौजमज्जा बालपणातल्या खेळांची
मनमुराद आनंद देणाऱ्या स्वप्निल क्षणांची
नव्हती कसली फिकीर ; होते सारे ऑलवेल
जखमा कितीही झाल्या तरी मनासमोर सारे फेल
मैदानावर खेळणं अन सूर मारून पोहोणं
दगड मारून झाडांवरच्या फळांना तोडणं
उद्योग सारे केलेले आठवतात जसेच्या तसे
म्हणून आजही जगतो आहे हिरवे बालपण असे
इथे भुकेची पर्वा होतीच कुणाला ?
आनंदासाठी सारे काही लावायचो पणाला
आता बालपणातली मौजमज्जा सरली आहे
मेंदूला कुरतडणारी दगदग तेवढी वाढली आहे
तरीही वाटते पुन्हा एकदा बालक व्हावं
आईसारखं कुणीतरी छातीशी धरावं
अन मनात जागं असलेलं बालक जपून ठेवावं
म्हणूनच वाटतं अवतीभवती आपलं कुणीतरी असावं

कवी – सुरेंद्र रामचंद्र पारवे
महाळुंगे , ( मुरुड-रायगड )