मैं जहा खडा रहता हूं लाईन वहींसे शुरू होती है!!
आज भी मैं फेके हुए पैसे नही उठाता!!
दारू पिने से लिवर खराब होती है.कितनी बार कहा है, दारू मत पी, मत पी, मत पी!
मैं और मेरी तनहाई अक्सर ये बाते करते है!!
तुम्हारा नाम क्या है बसंती!!
डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुम्कीन है!
एक बार मैने कह दिया ना बस कह दिया!!रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है!
तो आला त्याने पाहिलं आणि तो जिंकला… इतका सहज सरळ प्रवास त्याच्या नशिबात नव्हता…पण तो म्हणाला तसा खरच अनेक बाबतीत बाप माणूस आहे… आत्तापर्यंत तुम्हाला कळलच असेल की मी श्री. इन्किलाब श्रीवास्तव यांच्याबद्दल लिहिते आहे.

हो. तेच आपल्या सगळ्यांचे लाडके महानायक द अमिताभ बच्चन!!त्यांचे खरे नाव आहे इन्किलाब श्रीवास्तव!!त्यांच्या वडिलांनी स्वतःचे आडनाव बच्चन लावायला सुरूवात केली म्हणून त्यांचे पण आडनाव बदलून बच्चन झाले. शाळेत इन्किलाबचे नाव अमिताभ (तेजस्वी, बुद्धीमान) असे नोंदवले गेले आणि पुढे ते अमिताभ बच्चन या नावाने ओळखले जाऊ लागले.वयाच्या विशीत ते कोलकाता येथील एका जहाज कंपनीत नोकरी करत होते. तमाम हिंदी सिनेमासृष्टीचे अहोभाग्य की त्यांनी ती नोकरी सोडून अॅक्टिंगमध्ये आपले करियर करायचा विचार केला. त्यांनी रेडिओवरही निवेदकाच्या कामासाठी प्रयत्न केले होते पण गंमत अशी की ज्या त्यांच्या खर्जातल्या आवाजाच्या अनेकजण प्रेमात असतात तोच आवाज चांगला नाही असे म्हणून त्यांना रेडिओवरही सातत्याने काम मिळाले नाही.
अर्थात हे देखील रेडिओ वाल्यांचे उपकारच म्हणायचे. त्यांना त्यांच्या उंचीमुळे भूमिका नाकारल्या गेल्या. ७नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांचा सात हिंदुस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरुवातीला त्यांना कोणी फारसे काम देत नव्हते. पण त्यांनी मात्र चिकाटीने आणि मन लावून काम केले. कोणतीही भूमिका असो यांचे नाणे खणखणीत वाजायचे. जंजीर ने त्यांच्याभोवती असलेली नकारात्मकतेची, अपयशाची जंजीर तोडली आणि एका रात्रीत ते स्टार कलाकार झाले. मग मात्र जवळपास दोन दशके ते अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्यासाठी चित्रपट लिहिले गेले. निर्माते त्यांच्यासाठी कितीही काळ थांबायला तयार असायचे. सर्वच हिरॉईन्सना अमिताभ हिरो म्हणून हवे असायचे.त्यांची लोकप्रियता इतकी आहे की कोलकात्यात त्यांच्या नावाचे मंदीर उभारलेले आहे. कुली चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी झालेल्या अपघातातून ते वाचावेत म्हणून लाखोजणांनी आपल्या घरातले देव पाण्यात ठेवले होते. असंख्य नवस बोलले गेले. ते बरे झाले. नव्या धडाडीने आणि उभारीने कामाला लागले. फिनिक्स पक्ष्याने त्यांच्याकडून धडे गिरवावेत इतक्या वेळेला त्यांनी पुनःपुन्हा नव्याने कारकीर्द सुरू केली आहे.आपल्या बरोबरच्या कलाकारांचे काम सुधारावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या परीसस्पर्शाने अनेकांच्या कामात कमालीची सुधारणा झालेली दिसून येते. रेखा हे त्यातले ठळक उदाहरण आहे.
त्यांनी सुरू केलेल्या एबीसीएल कंपनीला मोठ्ठा आर्थिक फटका बसला. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वयाची साठी आली होती. त्यांचे चित्रपट चालत नव्हते. हातात कामे नव्हती. पण ते डगमगले नाहीत. आपल्या घराजवळ रहाणाऱ्या यश चोप्रांकडे ते एखाद्या नवख्या कलाकाराप्रमाणे चालत काम मागण्यासाठी गेले. यश चोप्रांच्या मुलाने त्यांच्या वयाला शोभेल अशी भूमिका मध्यवर्ती ठेऊन चित्रपट लिहून घेतला आणि त्यांची नवीन दमदार इनिंग सुरू झाली ती आजपर्यंत सुरुच आहे. त्यानंतर त्यांनी एकाहून एक नितांतसुंदर भूमिका केल्या. चिनी कम, निःशब्द, पिकू, ब्लॅक, पा किती नावे घेऊ??वयाच्या साठीत त्यांनी टिव्ही चॅनलसाठी अँकरिग करण्यात कमीपणा मानला नाही. गेली कित्येक वर्ष ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.कोणत्याही प्रकारचे पाचकळ विनोद न करता अतिशय सुसंस्कृतपणे एखाद्या कार्यकमाचे यशस्वी सूत्रसंचालन करता येते हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य स्पर्धकाला दडपण येऊ नये म्हणून ते प्रयत्नशील असतात. त्या सर्व स्पर्धकांबरोबर ते अतिशय आदराने बोलत असतात. त्यांना सन्मानाची वागणूक देतात. या कार्यक्रमात त्यांचा नर्मविनोदी हजरजबाबीपणा अनेकदा दिसून येतो.
जेव्हा सत्तरीतली अनेक माणसे कोणाच्यातरी आधाराशिवाय साधे चालायला घाबरतात तेव्हा हे महानायक कजरारे, सै शावा शावा च्या तालावर बेफाम नाचत होते.
पैसे कमावण्यासाठी त्यांनी मिळेल त्या जाहिरातीत कामे केली. अगदी तेल, साबण,सिमेंट, लहान मुलांचे कपडे, रेचक औषधे कोणत्याही जाहिरातीला ते नाही म्हणाले नाहीत. त्यांनी लोकांच्या टीकेकडे चक्क दुर्लक्ष केले केले. आपले घर चालवण्याकरता रिटायरमेंटनंतर दोन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्यांची मनोभूमिका नक्कीच समजली असेल.
आजही अनेक असाध्य रोग जडलेले असूनही ते आपला वाढदिवस कामात मग्न राहून साजरा करू इच्छितात. त्यांच्या या दुर्द्म्य इच्छाशक्तीला मनापासून सलाम. इतकी प्रसिद्ध व्यक्ती, हिंदी चित्रपट सृष्टीचा सम्राट पण तरीही अतिशय मृदू स्वभाव, सहकलाकारांबद्दल कमालीचा आदर आणि आपुलकीयुक्त वागणूक, वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे फक्त त्यांनाच जमू शकते. कलाकार म्हणून आणि त्याच बरोबर उत्तम माणूस म्हणून त्यांच्याबद्दल वाटणारा आदर शतपटीने वाढतो. अपयश पचवणे कठीणच असते पण यश पचवून जमिनीवरच स्थिर राहू शकणारे त्यांच्यासारखे फारच कमी!!
त्यांच्याबद्दल लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया असतील पण तरीही अमिताभ यांनी निभावलेली कोणतीही भूमिका दुसऱ्या कोणालाही तितक्याच ताकदीने जमलीच नसती याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. अॅक्टिंगमे तो वो सबके बाप लगते हैं… हेच खरे..
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा!!

डॉ. समिधा गांधी