बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका अधिकाधिक जवळ येत आहेत. परराष्ट्र धोरणांतर्गत मुत्सद्देगिरी सांगते की दर्जा वधारत असणार्या आणि उज्ज्वल भविष्याची मोठी शक्यता असणार्या देशाशी असणारे संबंध सतत दृढ व्हायला हवेत. आज भारताची जागतिक परिस्थिती अशीच आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या शक्तीलाही भारतासोबतचे संबंध सुधारायचे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाकडून अशी अनेक विधाने अलिकडे समोर आली आहेत, ज्यावरुन अमेरिकेला भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यात रस असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकन प्रशासनाच्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून भारत अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसाठी भारत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांच्या मते व्यापार, सुरक्षा, सहकार्य आणि तांत्रिक सहकार्य आदी क्षेत्रांमध्ये अमेरिकेला भारताचे विशेष महत्त्व जाणवते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात जपानमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान एआय, क्वाटंम काँप्युटींग, ङ्गाईव्ह जी, सिक्स जी, बायोटेक, स्पेस आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांचे सरकार शिक्षण आणि उद्योग यासंदर्भात मजबूत संबंध प्रस्थापित करण्यावर भर देईल, असे निश्चित झाले आहे. सहाजिकच येत्या काळात प्रगत तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढेल आणि हार्डवेअर क्षमतेमध्ये गुंतवणुकीच्या शक्यताही चांगल्या असतील.
येत्या काळात दोन्ही देशांदरम्यान शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणार्या क्वांटम तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त रोडमॅप बनवण्याबाबत एक करार होणे अपेक्षित आहे. या उपक्रमाद्वारे दोन्ही देश एकमेकांच्या अनुभवांचे आदानप्रदान करून अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवतील. सीमावादात अमेरिका भारतासोबत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कोणत्याही प्रक्षोभक कारवाईच्या विरोधात असल्याचे अमेरिकेने अनेकदा स्पष्ट केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये अमेरिकेने अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या चीनी लष्कराच्या प्रयत्नांना चुकीचे म्हटले होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनी सैन्यासोबत भेट घेतल्याच्या वृत्तानंतर पटेल यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, अमेरिका सीमेपलीकडून किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी किंवा नागरी घुसखोरी खपवून घेणार नाही. भारत प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर विकसित आणि कमी विकसित देशांचा बुलंद आवाज म्हणून उदयास येत आहे. आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. अमेरिकेलाही भारताच्या या भक्कम स्थितीचा ङ्गायदा उठवून आपले जागतिक हीत साधायचे आहे. द्विपक्षीय सहकार्याची वाढती परिमाणे लक्षात घेऊन अमेरिकेला भारतासोबत व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवायचे आहे. त्यामुळेच भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमध्ये एकमेकांना प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे, मजबूत होत असणारे लष्करी संबंध एकमेकांवरील विश्वास आणखी दृढ करत असल्याचेही दिसते.
अमेरिका आणि भारताने व्यापार, गुंतवणूक आणि कनेक्टिव्हिटीद्वारे जागतिक सुरक्षा, स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीला प्रोत्साहन देण्यात नेहमीच स्वारस्य दाखवले आहे. अलीकडच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे. भारत-अमेरिका संबंधांच्या दृष्टीने 2022 हे वर्ष ऐतिहासिक ठरले. आता दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांनाही 75 वर्षे झाली आहेत. 2022 मध्ये मोदी आणि बायडेन यांची दोनदा भेट झाली. मे 2022 मध्ये टोकियो येथे ‘क्वाड’ देशांच्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. तर नोव्हेंबर 2022 मध्ये दोन्ही नेते दुसर्यांदा इंडोनेशियातील बाली येथे संपन्न झालेल्या जी-20 शिखर परिषदेत भेटले.