माथेरान दि. 22 (मुकुंद रांजाणे) : माथेरान या पर्यटनस्थळावर पाहण्यासारखे मोजकेच ठराविक पॉईंट असून तेच डोंगर आणि दर्या पाहून आता कंटाळा आला आहे. आम्ही आमच्या परिवाराला केवळ मिनिट्रेन मधून जी काही निसर्गसौंदर्य पाहण्याची मजा येते ती अन्य कशातही नाही. परंतु रेल्वे प्रशासनाने या नॅरोगेज ट्रेनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आमचा पुरता भ्रमनिरास होत आहे त्यासाठी मिनीट्रेनच्या खाजगीकरणा शिवाय पर्याय उरलेला नाही असे मत मुंबई येथील पर्यटक श्रीहरी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या सह अन्य पुष्कळ पर्यटक हे तासंतास तिकीट लाईनीत उभे राहतो परंतु बोग्याची संख्या खूपच मर्यादित असून तीन बोग्या द्वितीय श्रेणी साठी तर एक बोगी प्रथम श्रेणी उर्वरीत दोन मालवाहू बोग्या यामुळे जेमतेम शंभर प्रवासी वाहतूक शटल सेवेच्या माध्यमातून केली जात आहे. सुट्टयांच्या हंगामात जवळपास पाच ते सहा हजार पर्यटक हे केवळ मिनिट्रेनची सफर करण्यासाठी येत असतात. तिकीट न मिळाल्यामुळेच नाईलाजाने इच्छा नसताना सुध्दा अन्य वाहतुकीच्या साहाय्याने भरमसाठ पैसे खर्च करून दस्तुरी टॅक्सी स्टँड गाठावे लागत आहे. माथेरान हे मुंबई पासून जवळ असल्याने मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. त्यातच दस्तुरी पार्किंग ठिकाणी सुध्दा काहीवेळा नियोजनाअभावी वाहने पार्क करता येत नाहीत त्यामुळे नाईलाजाने कुठेतरी जंगलात वाहने उभी केली जातात. नेरळ ते माथेरान दरम्यान केवळ दोन गाडया सुरू आहेत. इथल्या स्थानिकांनी सुध्दा अनेकदा आमदार ,खासदार त्याचप्रमाणे रेल्वेच्या अधिकारी वर्गाला प्रत्यक्ष भेटून निवेदने सादर केली आहेत परंतु रेल्वेच्या अधिकारी वर्गाची ही ट्रेन सुरळीत चालू राहावी अशी मानसिकता नसल्याने केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी करोडो रुपयांची या मार्गावर आजही कामे सुरू आहेत.
वर्षाकाठी लाखो रुपये कमावून देणार्या या मिनिट्रेनच्या बाबतीत आजही अधिकारी वर्ग गांभीर्याने लक्ष देत नसल्याने याचा विपरीत परिणाम स्थानिकांच्या व्यवसायावर होत आहे. अमन लॉज ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान कोणत्याही प्रकारचा घाट सेक्शन नसताना दोन इंजिन्स वापरले जात आहेत तर नेरळहुन
घाटातून येणारी गाडी ही एका इंजिनच्या साहाय्याने वर येते.मध्य रेल्वेच्या या सेवेत मोठया प्रमाणात आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असते त्यामुळे नवीन इंजिन आणून नेरळ माथेरान ट्रेनच्या निदान चार फेर्या सुरू व्हाव्यात त्याचप्रमाणे अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान बोग्याची संख्या वाढवून दहा ते बारा फेर्या सुरू झाल्या तरच येणार्या पर्यटकांना सोयीचे होणार आहे.अशी पर्यटकांसह स्थानिकांची मागणी होत आहे.