23 गाव नैना प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीसह महाविकास आघाडी आक्रमक
पनवेल दि. 23 ( राज भंडारी ) ः 23 गाव नैना प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीने नैना प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले. सलग 23 दिवसांमध्ये प्रत्येक गाव 100% बंद ठेवून नैना प्रकल्पाचा निषेध करण्यात आला. मात्र प्रशासनासह शासन मात्र गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. सिडकोच्या या धोरणांचा निषेध करण्यासाठी 23 गाव नैना प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समिती आणि महाविकास आघाडीच्यावतीने आज गुरुवारी 23 मार्च रोजी भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाला असंख्य ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून सिडको प्रशासनासह सत्ताधार्यांचा जाहीर निषेध केला.

यावेळी 3 ते 4 हजार वाहने घेवून साधारण 7 हजारांच्या आसपास ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चासाठी नैना प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, वामन शेळके, नामदेव फडके, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, मा.आ.बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शेकापचे विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, जी.आर.पाटील, डी.के.म्हात्रे, विलास फडके, बाळा फडके, ज्ञानेश्वर बडे, शंकरशेठ म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, दिपक घरत, शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील, राजेश केणी, कॉम्रेड भूषण पाटील, डी.के.भोपी, उद्योजक सुभाष भोपी, डी.बी.पाटील, अनिल ढवळे, आम आदमी पक्षाचे कोकण प्रदेश संघटन प्रमुख विलास घरत आदींसह हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी मोर्चाला संबोधता मा.आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, शेतकर्यांचा उद्रेक होण्यापर्यंत सिडको प्रशासन वाट पाहत राहिले आहे. नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती ही गेली 18 वर्षे नैना रद्द करण्यात यावी यासाठी लढत आहे. संपूर्ण तालुक्यातील शेतकर्यांना या भूमिकेचे महत्त्व पटवून देण्यासाठी केलेला संघर्ष कदापी वाया जाऊ देणार नाही. गेली 3 वर्षे या समितीसोबत पनवेल – उरण महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही काम पाहत आहोत. शेतकरी वाचला तर देश वाचेल या भावनेतून आम्ही सर्व कार्यकर्ते झटत आहोत. आज निरनिराळ्या वाहनांची भव्य रॅली पनवेल येथून सिडको कार्यालयावर धाव घेवून येत आम्ही सनदशीर मार्गाने सिडको प्रशासनाचा निषेध नोंदवून प्रशासनाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की, शासनाने शेतकर्यांच्या या मागणीवर गांभीर्याने विचार करून नैना सारखा प्रकल्प रद्द करावा. यापुढेही जर शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आणि आंदोलन छेडले जाईल, असेही बाळाराम पाटील यांनी यावेळी सांगितले.