ती आई आहे, ती ताई, मैत्रीण, पत्नी आहे.
ती मुलगी, सून, आत्या, मावशी, काकी, मामी ही आहे.
ती माया…… आदिमाया ……आदिशक्ती…… वीरांगना आहे. तीच जन्म व तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर सृष्टी, चराचर, निसर्ग, कुटुंब सर्वच व्यर्थ आहे.
पुराण काळापासून आपण स्त्री ही देवतारुपी समजून त्या कालपासून स्त्री ही ‘काळाय चमू ‘ चालवत आहे. स्री ही साक्षात सर्जनाची भूमी आहे. ती जननी आहे . स्त्रीला आपण धरतीचे(पृथ्वीचे) रूप मानतो. ती आपले अस्तित्व जपते. ह्या अफाट पसाऱ्यात आपलं

बिंदू एवढे स्थान बळकट करते. प्रयत्नांशी पराकाष्ठा करते. तिची अगदी लहानपणापासूनच धावपळ सुरू होते . पुढे ती घरांत अडीअडचणीत घर सांभाळणारी समजूतदार मुलगी बनते. कौटुंबिक गरजा पुरवणारी पालक बनते. संसार चालवणारी, घराणे वाढवणारी, गावं- गोतावळा सांभाळणारी इतर अनेक रूपांत ती आढळते . देश रक्षणार्थ वीरांगना या रूपातही आढळते.
आयुष्यातील अनेक समस्यांना तोंड देताना ती करारी, साहसी, धैर्यशील, कर्तव्यदक्ष, अभिमानी बनत गेली. ती …. च्या जीवनात अनेक बदल होत गेले. आपल्या अधिकारांसाठी लढा देणारी वीरांगना बनली.
आपल्या अधिकारांसाठी १९०७–१९०८ च्या दरम्यान असंख्य स्त्रिया तुरुंगात गेल्या ( जेल भरो आंदोलन ) . अखेरीस २जुलै १९२६ साली मताधिकार मिळाला.
भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम
काही समाजसुधारकांनी केले. म. ज्योतीबा फुले, क्रांतिवीर ज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा अधिकार भारतीय घटनेत दिला.

महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी जो लढा दिला, त्यांच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. अमेरिका, युरोप सहित जवळपास जगभरातील स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी लढा उभारला होता .
महिला दिवसाचा उगम कामगार चळवळीतून
झाला.याचं बीज रोवलं गेलं ते १९०८ साली १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार
या त्यांच्या मागण्या होत्या.
ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळवून देण्यात विमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन या पक्षान महत्वाच योगदान दिलं. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला होता आणि हेच रंग महिला दिनाचं प्रतीक बनले. जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक , हिरवा रंग आशेच प्रतीक, तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. महिला हक्काच्या आणि समानतेच्या लढ्याशी जांभळ्या रंगाचं नातं असल्यानंच हा रंग महिला दिनाचं एक प्रतीक बनलं आहे.
जागतिक महिला दिन हा रशियासकट अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. रशियात या काळात फुलांची विक्री चौपट होते. चीनमध्ये ८ मार्चला महिलांना अर्धा दिवस ( हाफ डे) दिला जातो.
इटलीमध्ये जागतिक महिला दिनाला ‘फेस्टा डेला डोना’ असेही म्हणतात. या दिवशी महिलांना मिमोसाची फुले दिली जातात.
अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना “महिलांच्या इतिहासाचा दिवस ” (वुमन्स हिस्ट्री मंथ ) म्हणून साजरा करतात. या दिवशी राष्ट्राध्याक्षांकडून अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जात.
जर्मनीतील कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लर झेटकीन यांनी प्रभावीत होऊन एक कल्पना मांडली की, “असा एक दिवस असावा, ज्यादिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यांसाठी लढाईचा निर्धार व्यक्त करू शकतील”. भारतात , मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा झाला.

दरवर्षी जागतिक महिला दिवस मोठया प्रमाणात उत्साहात साजरा होतो. वर्षभरात ज्या ज्या महिलांनी
काही विशिष्ट कार्य केले असते, जसे कला, क्रीडा , साहित्य, शिक्षण, सामाजिक विशेष कार्य केले असते, विशेष प्राविण्य साखविलेले असते, त्या महिलांचा सत्कार केला जातो. सन्मान केला जातो. अनेक संस्था व कार्यालयात महिला दिवस साजरा केला जातो.
अनेक महिलांनी निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, सत्तेची पदे भूषविली आहेत,त्यांना संधी दिली तर त्या काय करू शकतात, हे दाखवून दिले आहे. आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. स्व. इंदिरा गांधी, स्व. सुषमा स्वराज, श्रीमती प्रतिभाताई पाटिल, सुमित्रा ताई महाजन, शिवाय मेधा पाटकर यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. मीरा बोरवणकर, सुधा मूर्ती वगैरे वगैरे.
आजही राजकीय क्षेत्रात डॉ. नीलम गोरे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्राणिती शिंदे, पुनम महाजन, भावना गवळी, रक्षा खडसे, साधना गिरीश महाजन नगराध्यक्ष आहेत. यांसारख्या महिलांनी राजकीय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलंय. आजही अनेक स्त्रिया प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्य करीत आहेत. मुख्य सचिव , आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, नगर पालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियंता, बँक अधिकारी असे अनेक क्षेत्र आहेत, कुठलंही क्षेत्र बाकी नाही. जुना इतिहास पाहिला तर जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले अशी अनेक उदाहरणे देता येतील.
महिलांनी एकवेगला क्रांतीकारी इतिहास घडवलाय . आनंदीबाई, सावित्रीबाई, ताराबाई मोदक यांनी स्त्री शिक्षण, स्त्री मुक्तीचा पाया रचला. औण्यात पहिली कन्या शाळा काढली,एवढंच नाही तर १८ शाळा काढल्या.
आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही !
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगासी उद्धारी !
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व !
स्त्री म्हणजे मांगल्य , स्त्री म्हणजे मातृत्व !
या महान स्त्री शक्तीची एकच दिवस गुणगान गायचे?
तीनशे चौसष्ट दिवसांचे काय ?
स्त्रिया किती सुरक्षित आहेत ? हाही गहन प्रश्न आहे.
स्त्रियांना संरक्षणं मिळणे फार आवश्यक आहे.
स्त्री संरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक स्त्री ला मिळणे गरजेचे आहे. ती ची लक्तरे वेशीवर टागणाऱयांस
योग्य व कठीण शिक्षा होणे गरजेचे आहे. असे की असभ्य व घाणेरडे कृत्य करणाऱयांस ते कृत्य करण्यापूर्वीच त्या शिक्षा आठवून घाम फुटला पाहिजे.

वंदना बिरवटकर