Sunday, June 11, 2023
More
  Homeसंपादकीयअग्रलेखजाळे विणले जाता

  जाळे विणले जाता


  मोहाला बळी पडून जास्तीत जास्त नुकसान कसे होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनी ट्रॅपचे बळी. हनी ट्रॅप म्हणजे एखाद्याला मोहाच्या जाळ्यात अडकवून त्या व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती, प्रसंगी पैसे उकणणे. याचे वेगळेपण असे की तुम्ही या ट्रॅपचे बळी असाल तरीही शिक्षेला पात्र ठरू शकता. हनी ट्रॅपमध्ये अडकणार्‍या उच्चपदस्थांनी राष्ट्राच्या दृष्टीने गोपनीय माहिती दिली तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होऊ शकतो. या प्रकारात मुख्यत्त्वे हेरगिरी करणार्‍या आकर्षक स्त्रिया आपले सौंदर्य आणि मादकता ही प्रमुख अस्त्रे वापरून समोरच्याला संपूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून हवी ती माहिती काढून घेतात. हनी ट्रॅपिंग हे जास्त करून हेरगिरीसाठीच केले जाते. विदेशी गुप्तचर विभागासाठी काम करणार्‍या आकर्षक; पण हेरगिरीचे ट्रेनिंग असलेल्या स्त्रिया सरकारी उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी जवळीक साधून स्वतःच्या देशाला गुप्त माहितीचा पुरवठा करतात. काही वेळा प्रेमाच्या जाळ्यात अडकून अधिकारी स्वतःच ही माहिती पुरवतात तर काही वेळा ब्लॅकमेल करून हे हेर हवी ती माहिती काढून घेतात.

  हनी ट्रॅप ही संज्ञा हल्लीच आली असली तरी याची उदाहरणे पुराणातही मिळतात. पूर्वी ऋषिमुनींची तपस्या भंग व्हावी म्हणून नर्तकींना पाठवणे, प्रसंगी दानवांनी स्त्रीरुप धारण करणे हे प्रकार होत होतेच की. हनी ट्रॅपिंगला सुरुवात झाली ती तिथपासून. शिवाजी महाराजांच्या राजवटीतही या पद्धतीचा वापर झालेला दिसतो. इंग्रजांच्या राजवटीत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेल्या अनेक महिलांनी या पद्धतीने हेरगिरी केली. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हनी ट्रॅपिंगचा सर्वाधिक वापर झाला. गुप्तहेरांच्या हाती लागत नसे इतकी माहिती या हेरांच्या हाती लागत असे. युद्धजन्य परिस्थितीत कोणी तरी आपल्याशी प्रेमाने बोलत आहे, हे अधिकार्‍यांच्या दृष्टीने आश्वासक असायचे. पण त्यामुळे ते हनी ट्रॅपचे बळी ठरायचे. पूर्वी अनेक महिने नाते तयार करून मग हा ट्रॅप वापरला जात असे. हल्ली सोशल मिडीयामुळे या हेरांचेही काम सोपे झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून चॅट करून, प्रेमाच्या गोष्टी करून तसेच कामुक फोटो पाठवून अधिकार्‍यांना फसवले जात आहे. सरकारच्या गोपनीय प्रकल्पांबद्दल माहिती असणार्‍या प्रत्येक पदाधिकार्‍याला त्यांच्या ट्रेनिंमध्येच अशा अनेक प्रकारच्या हेरगिरीच्या पद्धतींबद्दल माहिती दिलेली असते. कोणत्याही नवीन व्यक्तीशी बोलताना काय काळजी घ्यायची हे ही शिकवलेले असते. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक नवीन व्यक्तीबद्दलची खडान्खडा माहिती या अधिकार्‍यांना माहिती असणे गरजेचे असते. काही वेळा ही तपासणी न करताच काही अधिकारी आकर्षणाच्या आहारी जाऊन हनी ट्रॅपिंगला बळी पडतात. अर्थात काही वेळा पार्श्वभूमीची पूर्ण तपासणी करुनही अधिकारी हनी ट्रॅपला बळी पडतात.

  हेरगिरी करणार्‍या प्रत्येकाकडेच तीन-चार तरी वेगवेगळी ओळखपत्रे असतात. हे हेर आपली खरी ओळख कधीच समोर आणत नाहीत. खोटी ओळखपत्रे तयार करणे बेकायदेशीर असले तरी त्यांना ती मिळतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयडेंटिटी फार्मिंग. अनेक वेळा काही ना काही कारणाने नवजात बालकांचा मृत्यू होतो. अशा वेळी तो मृत्यू न नोंदवता त्यांच्या जन्माच्या दाखल्याच्या आधारावर त्यांची पुढची कागदपत्रे तयार केली जातात. शाळेतील प्रगतीपुस्तकापासून आधार कार्ड, सोशल सिक्युरिटी नंबरपर्यंत सगळी कागदपत्रे त्या व्यक्तीच्या नावावर मिळवली जातात. वास्तविक, ही व्यक्ती अस्तित्त्वातच नसते. अशी तगडी पार्श्वभूमी असणारी ओळख एका ठराविक किंमतीला विकली जाते! खरी ओळख लपवण्यासाठी ही ओळख’ विकत घेतली जाते. आता अशा प्रसंगी कोणत्याही अधिकार्‍याने कितीही पार्श्वभूमी तपासून बघितली तरी त्याचा काय उपयोग होणार? बेकायदेशीरपणे शाळेत अ‍ॅडमिशन घेतानाच्या पातळीवरच हे गुन्हे थांबवले गेले, तर फरक पडू शकतो.

  वस्तुत: अधिकार्‍यांना नेमताना, नेमल्यावर वेळोवेळी त्यांची मानसिक स्वास्थ्य चाचणी होणे आवश्यक आहे असे वाटते. अधिकार्‍यांना काही समस्या सतावत असेल तर हेर त्याच समस्येचे भांडवल करतात. हनी ट्रॅपला बळी पडलेल्या अधिकार्‍यांना अटक होते. शासकीय गोपनियता अधिनियमाअंतर्गत त्यांच्यावर कारवाईही होते. या कायद्याअंतर्गत कोणताही सरकारी गोपनीय दस्तावेज, संकल्पचित्र, नमुनाकृती, युद्धसामग्रीची माहिती, शासनाच्या अखत्यारीतील पदे आणि त्यांची माहिती, छायाचित्रे, गोपनीय ठिकाणे, जसे की सैनिकी, नौसैनिकी, वायुसैनिकी आस्थापना यांची माहिती, गोपनीय रेखाटने, आराखडे यांची माहिती तसेच दळणवळणाच्या साधनांच्या मार्गांची माहिती अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण झाली असता शिक्षा होऊ शकते. सध्या डीआरडीओचे संचालक कुरुलकर अशाच एका हनी ट्रॅप प्रकरणात पकडले गेले आहेत. याआधीही असे अनेक अधिकारी पकडले गेले, ज्यांच्यावर अजूनही कारवाई चालू आहे.

  दुसर्‍या बाजुने पाहता एक सत्य असेही आहे की ही पद्धत आपल्या देशाचे हेरही वापरत आहेतच. त्यामुळे ही पद्धत बरोबर का चुकीची हा प्रश्नच उरत नाही. आपल्यासमोर न आलेलीही अनेक प्रकरणे घडली आहेत, त्याचा देशाला वेळोवेळी तोटाही झाला आहे, हे समजून घेऊन अधिक दक्ष कसे राहता येईल हे पाहणे इथे महत्त्वाचे आहे. पडद्यामागची शीतयुध्दे पूर्वापार चालत आली आहेत. ती हनी ट्रॅपच्या काही घटनांद्वारे आपल्या समोर आली इतकेच! तसे बघायला गेले तर या शीतयुद्धात कोणाचा मृत्यू होत नाही, मृत्यू होतो तो विश्वासार्हतेचा, नितीमूल्यांचा. तंत्रज्ञान प्रगती करत आहे तसे त्याचे तोटेही समोर येत आहेत. डिजीटली हनी ट्रॅपिंग करणे खूप सोपे झाले आहे. हल्ली स्नॅपचॅट आणि त्यासारख्या काही अ‍ॅप्समध्ये उपलब्ध असलेल्या फिल्टरद्वारे पुरुषही अगदी हुबेहुब स्त्रीसारखा दिसू शकतो. अशा युजर्सकडून व्हिडिओकॉलद्वारे अश्लील चित्रफिती तयार केल्या जातात. या चित्रफितींच्या बदल्यात पैसे किंवा माहितीची मागणी होते. अनेक वेळा देशातल्या देशातही माहितीची अफरातफर होते. पैसे किंवा इतर अमिषांना बळी पडून देशातल्या देशातही माहितीची अफरातफर होते. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या देशात होणार्‍या हनी ट्रॅप्सचा नायनाट कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. तंत्रज्ञान इतके प्रगत होत आहे की आणखी काही वर्षांनी कदाचित हनी ट्रॅपिंगची गरजही भासणार नाही; पण नीतीमूल्ये सोडून अमिषांना भुलणे कमी होईल तेव्हा अशा प्रकरणांचे बळी आपोआप थांबतील.
  (अद्वैत फीचर्स)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: