Sunday, June 11, 2023
More
    HomeMainरायगडचवदार तळे क्रांतीदिनी बार्टीने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे केले अभिवादन

    चवदार तळे क्रांतीदिनी बार्टीने विविध सामाजिक उपक्रमांद्वारे केले अभिवादन


    पाली/बेणसे दि. 21 (धम्मशील सावंत) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे अंतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,महाड येथे 96 वा चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
    डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील सभागृहात समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी बोलतांना बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले पिण्याचे पाणी अस्पृश्यांना मिळावे म्हणून संगर केला. हिच ती क्रांतिकारी भुमी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जो जाईल त्यांची प्रगतीच होईल त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण कार्य करुया असे मनोगत व्यक्त करुन त्यांनी क्रांती दिनी अभिवादन केले.


    डॉ प्रशांत नारनवरे अभिवादन करताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारानेच 1932 साली मानवी हक्क नसलेल्याना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची स्थापना झाली. वंचितांना न्याय देण्यासाठी आपण काम करावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करावा लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
    यावेळी डॉ भंदत राहुल बोध्दी महाथेरो, ज्येष्ठ विचारवंत ज वि. पवार, यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी चवदार तळे , क्रांतीस्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
    भिमा तुझ्या जन्मामुळे या टिमचे महाडच्या सत्याग्रहाचे राष्ट्रीय स्मारक ते चवदार तळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी प्राशान केलेला जीवंत देखावा सादर करुन देखाव्यातून अभिवादन केले.तसेच बार्टी मार्फत महामानवाच्या मौल्यवान पुस्तकांचे अल्प दरात वितरण करण्यात आले. अनुयायांसाठी भोजन व स्लाईट पाणी बॉटल यांचे देखिल मोफत वाटप करण्यात आले.
    यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर अनुयायी समता सैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्टी मुख्यालयातील व महाड व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.
    यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे , समाजकल्याणचे सहसचिव दिनेश डिंगळे, बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार , डॉ भंदत राहुल बोध्दी महाथेरो, दलित पँथरचे संस्थापक साहित्यिक ज. वि. पवार, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य नागसेन कांबळे, कोकणच्या उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, बार्टी संस्थेतील विभागप्रमुख श्रीमती नंदिनी आवडे, स्नेहल भोसले, डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती वृषाली शिंदे, रविन्द्र कदम, अनिल कांरडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्रास्ताविक विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले. आभार बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: