Sunday, June 11, 2023
More
  Homeसंपादकीयलेखगजर ने किया है इशारा!!

  गजर ने किया है इशारा!!

  एक काळ असा होता की लवकर पहाटे जाग यायची. पक्षांची किलबिल, गायीचे हंबरणे आणि मुख्य म्हणजे कोंबड्याची बांग!!

  ती ऐकू आली की मोठी माणसे उठायची व सूर्य उगवायच्या आत सगळे घर उठून कामाला लागायचे.

  हळूहळू गावातली माणसे शहरात आली आणि लोकल ट्रेनचा आवाज, बस, गाड्यांचे भोंगे झालच तर दुधवाल्या भैय्याने दिलेल्या “बाई, दूध” या आरोळीने घर जागे होत असे..

  सर्वात आधी मोठी माणसे उठायची मग लहानांना उठवायची. “आई, पाच मिनिटं झोपू दे ना! मी उठते मग.” असे सांगून आणखी काही वेळ झोपण्यात जे सुख आहे ते राजाच्या राजमहालातही मिळणार नाही.आणखी एक गंमत म्हणजे माझा लेक लहान होता तेव्हा त्याला

   उठवायला त्याचा बाबा जायचा आणि बापलेक दोघेही एकत्र साखर झोपेच्या अधिन व्हायचे. इकडे घड्याळाच्या काट्याबरोबर माझा पारा वाढायचा…विषयांतर झालेय थोडेसे…

  तर सकाळी उठणे हे झोप पूरी होऊन आपोआप जाग आली इतके साधे होते एकेकाळी. एखाद दिवशी प्रवासाला जायचे असेल किंवा काही कारणाने लवकर उठायचे असेल तर मग गजराचे घड्याळ शोधले जायचे त्याला आवर्जून किल्ली दिली जायची. गंमत म्हणजे गजराने जाग आली नाही तर.. या धास्तीने रात्रभर झोपच यायची नाही..(.मला तर  याचा अनुभव अजूनही येतो. पहाटे उठून कुठे जायचे म्हटले की रात्रीच्या झोपेचे हमखास खोबरे होणार….) 

  तर हळूहळू मुले मोठ्या शहरात प्रसंगी दुसऱ्या देशात राहू लागली. इथेसुद्धा सात तेरा किंवा आठ अकराच्या लोकल्सचा दरारा वाढला आणि आपण सरसकट उठण्यासाठी मोबाईलच्या आधीन झालो!!

  मोबाईलच्या गजराची ट्यून हे त्या मोबाईलधारकाचे व्यक्तीमत्व दाखवते.

  एखाद्याला शास्त्रीय संगीत किंवा हरीप्रसाद चौरासियांची बासरी उठवते. एखाद्या गुलाबी वयातल्या त्याला किंवा तिला एखादीला एखादे रोमॅन्टिक गाणे उठवते. रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या एखाद्याला असल्या मंजूळ आवाजाने जागच येणार नाही असे वाटते मग एखादी कर्कश्श ट्यून सेट केली जाते. गंमत म्हणजे आजूबाजूचे त्या आवाजाने उठतात पण तो मोबाईलधारक मात्र सुखेनैव झोपलेला असतो.

  एखादा उठायच्या वेळेचा गजर लावतो तर एखादा वेळेच्या दहा मिनिटे आधीचा गजर लावतो. *व्यक्ती तितक्या गजराच्या पद्धती*

  या मोबाईलच्या गजराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे  डुलकी काढायची सोय…. आपली मानसिकता किती अचूक ओळखलीय नाही!

  पहिल्या गजराने आपण उठलो नाही तर परत तीन चार मिनिटांनी तोच गजर वाजतो. “आई पाच मिनिटे झोपू दे ना” ची आठवण अशा वेळी हमखास येते.

  आतातर काय कामावर जायची वेळ ते पाणी प्यायची वेळ झाली याची आठवण करण्यासाठी गजर सेट केला जातो. एखादे काम आठवावे म्हणून पदराला किंवा रुमालाला गाठी बांधणे तर केव्हाच आऊटडेटेड झालेय (एकतर पदराची जागा ओढणीने घेऊनही जमाना लोटलाय आता तर त्याजागी स्ट्रोल आलेयत आणि रुमाल कोण वापरतोय? टिश्यूपेपरांचे छोटे पाकिट ठेवायचे पर्स मध्ये. वापरा आणि टाका..)  तर अशा कामांच्या आठवणीसाठीपण मोबाईलाच कामाला लावले जातेय.

  कठीण समय येता मोबाईल अशा तर्‍हेने कामास येतो!!

  चला माझ्या मोबाईलने क्लिनिकला जायची वेळ झाली हे सांगितलय.

  वेळ दाखवणाऱ्या अ‍ॅपसारखे वेळ पाळायला लावणारे अ‍ॅप पण असायला हवे होते नै

  डॉ.समिधा गांधी 

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: