Sunday, June 11, 2023
More
    Homeपनवेलकळंबोलीकळंबोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते एकवटले सभासद नोंदणी व पक्षवाढी संदर्भात...

    कळंबोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते एकवटले सभासद नोंदणी व पक्षवाढी संदर्भात चर्चासत्राचे आयोजन


    पनवेल दि.24 (साहिल रेळेकर) ः पनवेल परिसरातील वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना मानणारा वर्ग आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची काम करण्याची पद्धत आणि सर्वसमावेशक न्याय देणारी कार्यप्रणाली यामुळे प्रेरित होऊन आमच्यासमवेत अनेकजण पक्षात आले आहेत. शरद पवार यांनी साडे बारा टक्के मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले नसते तर आजची ही विकसित शहरे पाहायला मिळाली नसती. महिलांना 50% आरक्षण देण्याचे कामही शरद पवार यांनी केले. सातत्याने शरद पवार यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनात कोणतेही मतभेद नसावेत. कार्यकर्त्यांना कोणतीही समस्या उद्भवल्यास खा.सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन. कार्यकर्त्यांनी न डगमगता पक्षवाढिसाठी कसोशीने प्रयत्न करावेत. वाटेत अनेक अडथळे येतील, मात्र माझ्या जीवात जीव असेपर्यंत कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांनी दिली. ते कळंबोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल आयोजित बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना बोलत होते.
    रोडपाली येथील श्रीमती बारकूबाई नामदेव पाटील विद्यालय कळंबोली येथे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल आयोजित बुथ कमिटी गठीत करणे, सभासद नोंदणी अभियान तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व पक्षवाढी संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी, माजी नगरसेवक विजय खानावकर, महादेव पाटील, संदीप म्हात्रे, प्रा.नारायण खरजे, सुरेश रांजवण, राजकुमार पाटील, विजय चव्हाण, सुनिल नाईक, आर एन यादव, भाऊसाहेब लबडे, चंद्रकांत नवले, सुनिल मोहोड, सुनिल ढेंबरे, शरद गायकवाड, योगेश निपाणी, राजुभाई मुलाणी, विजयदादा मयेकर, शशिकला सिंग, प्रज्ञा चव्हाण, अनुराधा रंगारी, मंगेश नेरुळकर, हरपिंदर सिंग विर, रणजित नरुटे,सुप्रिया अंबेतकर, संगीता पवार, सुदेशना रायते, जयश्री खटकले, आरती पोतदार, सुनीता माळी, शिला घोरपडे,सी पी चंदनशिवे, अश्विनी भोसले, हर्षल गायकवाड, गुलाब गायकवाड, तुषार सावंत, रोशन आंग्रे, प्रभाकर फडके, अनुराग गायकवाड, महेश पाटील, रविनाथ पाटील, अतुल दवणे, दीपक भोपी, सचिन पवार, माऊली मोरे, दिलीप आंग्रे, अस्मिता पाटील, अनिल डोंगरे, महेश पाटील, सचिन कुंभार यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्ह्याच्या वतीने बर्‍याच दिवसापासून एक व्यथा होती की कुठेतरी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करावी. त्यानिमित्ताने याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीचा उद्देश कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे हा होता. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर असेल किंवा काही व्यथा असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न म्हणुन ही बैठक घेण्यात आली. येणार्‍या सर्व निवडणुकांबाबत विचारविनिमय करण्यात आला.
    तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. परंतु दुर्दैवाने पनवेलमध्ये पक्षीय वातावरण फारच दूषित झालेले आहे. या संदर्भात प्रदीर्घ काळापासून चर्चा होत होत्या, परंतु त्यातून काही निष्पन्न होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी पुढे येऊन हा मार्ग अवलंबला आहे. पक्षाचे काम करताना योग्य तो मान मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील रोष व्यक्त केला. ही फक्त चिंगारी आहे, यापुढे बरेच काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य राजकुमार पाटील यांनी यावेळी केले.
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल आयोजित बैठकीत प्रथमच कार्यकर्त्यांच्या मनातील स्थानिक नेत्यांविषयीचे मत व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे पुढील काळात पनवेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक उमेदीने व पूर्ण ताकदीने वाटचाल करेल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे वेळोवेळी कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर कार्यकर्त्यांनी ’प्रिन्सिपल बदला, शाळा नाही’ असा टोला प्रदेश युवक सचिव संदीप नाईक यांनी आपल्या मनोगतात लगावला.
    या बैठकीला राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील हे उपस्थित राहिले नसून त्यांच्याविराधात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. यावेळी जिल्हाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांना बैठकीचे आमंत्रण दिले जात नाही, एखाद्या विषयावर माहिती करून घेण्याकरिता फोनवरून संपर्क साधला असता नीट उत्तरे दिली जात नाहीत, पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडणे, कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणे तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य न करणे याबाबत जिल्हाध्यक्षांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजीचा पाढा वाचण्यात आला. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून पक्षश्रेष्ठींनी जिल्हाध्यक्ष बदलावा अन्यथा सामूहिक राजीनामे देऊ, असा आक्रमक पवित्रा यावेळी कार्यकर्त्यांनी घेतला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: