पनवेल,दि.17 (प्रतिनिधी) : एसबीआय बँकेच्या 2023 च्या सीएसआर फंडातून महापालिकेस बेसिक लाईफ सपोर्ट’ ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा पालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी मोठा उपयोग होणार आहे. या हस्तांतरणाच्या कार्यक्रमावेळी एसबीआय बँकेचे मुंबई मेट्रो सर्कल नेटवर्क ख चे जनरल मॅनेजर मनोजकुमार सिन्हा यांनी आयुक्त श्री. गणेश देशमुख यांना प्रतिकात्मक किल्ली देऊ केली. यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य् अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, डेप्युटी मॅनेजर ईस्ट झोन सनातन मिश्रा, रिजनल मॅनेजर धमेंद्रकुमार सिंग, चीफ मॅनेजर अमितकुमार ,लेखा परिक्षक विनयकुमार पाटील,वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेने नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यावरती कायमच भर दिला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील महापालिकेने नऊ नवीन नागरी प्राथमिक आरोग्य् केंद्र तसेच शहरातील झोपडपट्टी भागात व आरोग्य केंद्रापासुन दुर असलेल्या भागामध्ये फिरत्या वाहनाद्वारे नागरीकांना प्राथमिक, उपचारात्मक आणि संदर्भ आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविण्यासाठी पनवेल 04 मोबाईल मेडिकल युनिट प्रस्तावित केले आहे.या पार्श्वभूमीवरती महापालिकेस एसबीआय बँकेकडून मिळालेल्या रूग्णवाहिका उपयोगी पडणार आहे. महापालिकेकडे सध्या सात रूग्णवाहिका असून एक शववाहिका आहे. एसबीआय बँकेकडून मिळालेली रूग्णवाहिकेमुळे या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या खारघर ,कामोठे, पनवेल, कळंबोली या चारही प्रभागामध्ये रुग्णसेवेसाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग होत असतो.याबरोबरच येत्या काळात महापालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 50 खाटांचे 02 शहरी समुदाय आरोग्य केंद्र तसेच 450 खाटांचे सुसज्ज माता- बाल संगोपन केंद्र उभारणीचे काम पालिका हाती घेणार आहे. यासाठीही या रूग्णवाहिकांचा उपयोग होणार आहे.