Sunday, June 11, 2023
More
    Homeरायगडकर्जतई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

    ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

    माथेरान दि. 30 ( मुकुंद रांजाणे ) : दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी एकमताने ठराव पारित केल्यामुळेच सध्या माथेरान सारख्या डोंगराळ भागात अनेक अडचणींचा सामना करत पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्यामुळे अत्यंत स्वस्त सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    माथेरान मध्ये घोडा आणि मानवचलीत हातरीक्षा हीच मुख्य प्रवासी वाहने आजतागायत उपलब्ध आहेत परंतु कष्टकरी हातरीक्षा चालकांना या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी त्यांनाही सन्मानाचे जीवन जगता यायला हवे त्यासाठी निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार याठिकाणी पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आबालवृद्ध पर्यटकांना तर ही जीवनवाहिनी बनली आहे.
    महात्मा गांधी मार्ग ह्या मुख्य धूळ विरहित रस्त्यांची कामे सुध्दा युद्धपातळीवर सुरू आहेत.त्यामुळे येथील धुळीला हद्दपार करण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते हा आगामी काळात सर्वांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.दस्तुरी पासून गावात येण्यासाठी अनेकदा रात्री अपरात्री स्थानिकांना तसेच पर्यटकांना खूपच त्रासदायक बनले होते. त्यामुळेच ई रिक्षा सारखी स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची उत्तम सोय निर्माण झाल्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.5 डिसेंबर 2022 पासुन ही सेवा सुरू झाली असून 5 जानेवारी पर्यंतच्या एका महिन्यात जवळपास एक लाख पर्यटकांनी इथे हजेरी लावली आहे. याच माध्यमातून नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळेच पर्यटक वाढले तर आपसूकच इथल्या सर्वच व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अल्पावधीतच सर्वांना ई रिक्षाचा स्वीकार करावाच लागणार आहे.सुरुवातीपासूनच सर्व पक्षाच्या नेत्यांनी बळ दिल्यामुळे तसेच सुनील शिंदेंचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, जिद्द आणि चिकाटीमुळे आज माथेरान मध्ये ई रिक्षा सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहे.झटपट, स्वस्तात प्रवासाची उत्तम सोय या माध्यमातून सुरू झाल्याने ई रिक्षाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
    ई-रिक्षामुळे उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत पर्यटक माथेरानला येतील. श्रीमंत पर्यटक आल्यामुळे हॉर्स राइडींगचा व्यवसाय वाढेल. आता जे फक्त शनिवारी रात्री राहणारे पर्यटक यायचे त्याऐवजी संपुर्ण आठवडा पर्यटक माथेरानला राहतील. सर्वांच्याच व्यवसायात वाढ होईल. ही ई रिक्षा माथेरानकरांची आर्थीक उन्नती करेल. माथेरानकरांच्या शैक्षणिक, सामाजीक व आर्थीक प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. ः मनोज खेडकर — माजी नगराध्यक्ष माथेरान
    दस्तुरी वरून आम्ही घोड्यावर बसून आलो त्यावेळी आमची बॅग सोबत घेऊन आलो होतो परंतु माघारी जाताना ई रिक्षामध्ये बॅग घेतली नाही त्यासाठी आम्हाला हमालाला वेगळे पैसे मोजावे लागले तर असे होऊ नये या ई रिक्षात सामान सुध्दा घेण्यात यावे.आणि या रिक्षांच्या संख्या लवकरच वाढ करावी ः नरहरी कवीतके — पर्यटक पुणे
    प्रत्येकाला माथेरान साठी काही करायचं असतं. मग तुम्ही जिथे राहता तिथल्या परिसरासाठी करा. प्रत्येकाने हे आपल्या परिसरापुरतं केलं तरी माथेरान सुंदर होईल. माथेरानची जनता हा देखील माथेरानचा घटकच आहे. या सर्वांच्या सुख सोयी आणि विकास करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. माथेरानच्या सर्व जनतेसाठी ई- रिक्षा घरापर्यंत उपलब्ध झाली पाहिजे. माथेरान मधील सर्व विभागांचा विकास होणं गरजेचं आहे, नाहीतर विषमता वाढेल आणि संघर्षाला सुरुवात होईल. समृद्ध आणि सुंदर माथेरान हा आदर्श माथेरानवासीयांनी घालून दिला पाहिजे. ः कल्पना पाटील – मुख्याध्यापिका, गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्ट माथेरान

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: