रसायनी दि 7 (राकेश खराडे) : खालापूर-चौक-कर्जत-पनवेलला अतिशय महत्वपुर्ण दुर्गांची साखळी लाभली आहे. त्यात कलावंतीण, प्रबळगड, सोंडाई, ईर्शालगड हे महत्वाचे दुर्ग येतात.
याशिवाय या विभागात अनेक पुरातन मंदिरे, ऐतिहासीक शिळा, गुंफा, बाराव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला सापडतात.

त्यातल्यात्यात साखळी मधील दुर्ग श्री ईर्शालगड हा एक महत्वाचा दुर्ग, खासा सरनोबत नेतोजी पालकरांचे वास्तव्य ज्या चौक परिसरात होते . अशा परिसरात असलेला दुर्ग श्री ईर्शालगड हा ऐतिहासीक तथा भौगोलीक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा दुर्ग ठरतो. आजही अनेक इतिहास प्रेमींना व ट्रेकर मंडळींना ईर्शालगड हे मोठे आकर्षण आहे. परंतू गडावर अनेक वास्तू आजही संवर्धनाची वाट पाहत आहेत त्याप्रमाणें गडावर संवर्धन व्हावे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिक असणारा परम पवित्र भगवा ध्वज गडावर असावा ह्या हेतुने वेध सह्याद्री चौक विभाग मार्फत दुर्ग श्री ईर्शालगड श्रमदान मोहिम राबविण्यात आली. सलग तीन दिवस वेध सह्याद्रीच्या सदस्यांनी प्रचंड मेहनतीने गडाखालून सामान गडावर नेले व मोहिम यशस्वीरित्या पार पडली. सदर मोहिमेला वेध सह्याद्रीचे 60 पेक्षा अधिक सदस्य हजर होते. वेध सह्याद्रीमार्फत गडावर 34 फुटी ध्वजस्तंभ बसवण्यात आला व दिमाखानं भगवा ध्वज ईर्शालगडावर फडकताना दिसू लागला आहे. येणार्या काळात गडावर अनेक संवर्धन मोहिमा घेतल्या जातील असे नियोजन सुद्धा करण्यात आले आहे.