उरण दि 23( वार्ताहर) : विंधणे, चिरनेर, दिघोडे,वेश्वी, चिर्ले, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा,पिरकोन, सारडे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंटेनर यार्डची बांधकामे सुरू असून, त्याकडे स्थानिक ग्रामपंचायत, तहसील कार्यालय,वन, सिडको,नैना या खात्यांचा अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.त्यात सिडकोच्या नैना अतिक्रमण विभागाकडून काहींवर सोयीनुसार कारवाईचा हातोडा पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जेएनपीए बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा शेवा – शिवडी लिंक,उरण रेल्वे या प्रकल्पामुळे उरण परिसराचा कायापालट झपाट्याने होत आहे.त्यात अनेक खासगी भांडवलदार आणि व्यावसायिकांनी सध्या चिर्ले, वेश्वी, दिघोडे,विंधणे, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोन,सारडे,वशेणी या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे. आणि त्या ठिकाणच्या जमिनीवर दगड, माती बरोबर डेब्रिजचा भराव टाकून पर्यावरणाचा र्हास करुन अनाधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामांचे बांधकाम सुरू केले आहे.अशा बांधकामांना स्थानिक ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, सिडको, नैना,वन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी नोटीसा बजावल्या आहेत.मात्र त्या नोटिसादेखील पडद्या आड गेल्या आहेत.
त्यामुळे उरणचे आमदार महेश बालदी यांनी हिवाळी अधिवेशनात उरण तालुक्यातील अनाधिकृत कंटेनर यार्ड, गोदामांचा प्रश्न उपस्थित केला.तसेच विधानसभेचे अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रशासनाकडून माहिती घेऊन तातडीने कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.परंतु सदर भांडवलदार, व्यवसायिकानी स्थानिक ग्रामपंचायत,उरण तहसील कार्यालय,वन, सिडको, नैना,रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ,कँस्टम सह इतर विभागाकडून कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला न घेता उलट विधिमंडळात आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आवाहन देण्याचे काम केले आहे.त्यामुळे पडद्या आडील कंटेनर यार्ड आणि गोदामांच्या अनाधिकृत बांधकामांना विधिमंडळातूनच हिरवा कंदील देण्याचा कुटिल डाव तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.